उदगीर, निलंगा आणि औसा नगरपरिषद निवडणुकींसाठी काँग्रेसकडून निरीक्षकांची नियुक्ती.

लातूर, दि. १२ नोव्हेंबर २०२५ (बुधवार)लातूर जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद निवडणुकांमध्ये संघटनात्मक बळ वाढविण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाने तीन अनुभवी नेत्यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. ही नियुक्ती पक्षाच्या प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख हे वरिष्ठ नेते आणि जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या विचाराने करण्यात आली आहे.उदगीर नगरपरिषदेसाठी विलास सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक रवींद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव, कार्यकर्त्यांशी घनिष्ठ नाते आणि प्रशासकीय समज लक्षात घेता त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. रवींद्र काळे उमेदवार निवड, प्रचारयोजना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून उदगीरमधील कामाचे नेतृत्व करतील.निलंगा नगरपरिषदेसाठी ट्वेन्टी वन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. व्यवस्थापन कौशल्य आणि जनसंपर्कातील प्रगल्भतेमुळे विजय देशमुख निवडणूक प्रक्रियेचे नीटसे नियोजन आणि आयोजन सुनिश्चित करतील.औसा नगरपरिषदेसाठी पक्षाकडून विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष व माजी उपमहापौर ॲड. समद पटेल यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील त्यांचा अनुभव आणि संघटनात्मक प्रभुत्व या भागात निर्णायक ठरतील.या तीन नियुक्त्यांमुळे काँग्रेस पक्षाला लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकींसाठी संघटनात्मक तयारी मजबूत करण्यास व सुसंगत रणनीती आखण्यात मदत होणार आहे. जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी म्हटले की “अनुभवी नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. एकत्र येऊन काम केल्यास पक्षाला योग्य फळ मिळेल.”




