क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

“पुरस्काराच्या मंचावर ‘आदर्श’, पण जनतेसमोर ‘भ्रष्ट’ लातूरच्या महसूल विभागाचं दुहेरी राजकारण”

दिनांक 30/10/2025 – ( bedhadak awaj ) लातूर जिल्ह्यातील प्रशासनात “आदर्श” ही संज्ञा आता उपरोधाने वापरावी लागेल, कारण ज्या तलाठ्याला काही दिवसांपूर्वी पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते “आदर्श तलाठी” म्हणून सन्मानित करण्यात आलं, त्याच अमोल रामशेट्टे या तलाठ्यावर लाच मागितल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. हेच का आदर्शपणाचं नवं मॉडेल? पुरस्कार घेतल्याचं समाधान आणि त्यानंतर लाच मागण्याचं धाडस दोन्ही गोष्टी एकाच अधिकाऱ्याकडून!

नळेगाव (ता. चाकूर) येथील ५२ वर्षीय तक्रारदाराने आणि त्याच्या भावाने कोर्ट डिक्री केलेली १५ आर जमीन आपल्या नावावर फेरफार करण्यासाठी अर्ज केला. पण या प्रकरणी तलाठी अमोल रामशेट्टे यांनी ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी केली. पडताळणीदरम्यान रामशेट्टे यांनी पंचासमक्ष ४० हजार रुपयांची मागणी केली आणि शेवटी ३९ हजार रुपयांत “डील” ठरवली. ही रक्कम थेट तलाठी कार्यालयात काम करणाऱ्या सदा नावाच्या खाजगी व्यक्तीकडे देण्यास सांगण्यात आली.

सापळा रचला गेला. पण तलाठीस संशय आल्याने लाच स्वीकारली गेली नाही. तरीही पडताळणीतील पुराव्यांच्या आधारे लाचलुचपत विभागाने २९ ऑक्टोबर रोजी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्रमांक ५७५/२०२५ अंतर्गत कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईचे सापळा अधिकारी उपअधीक्षक संतोष धनसिंग बर्गे तर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे आहेत.

मात्र खरा प्रश्न असा अशा तलाठ्याला “आदर्श” पुरस्कार देताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं वर्तन, त्याच्याविरुद्धच्या तक्रारी आणि जनतेतलं मत जाणून घेतलं होतं का? की इथेही “सर्व काही ठरवूनच” सन्मान दिला गेला? पुरस्कार वितरणाच्या झगमगीत स्टेजवर जेव्हा भ्रष्ट हात गौरवले जातात, तेव्हा खऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा अपमान होतो, हे प्रशासनाला जाणवतं का?

लातूर जिल्ह्यात असे अनेक “आदर्श तहसीलदार” आणि “आदर्श तलाठी” आहेत, जे जमिनीच्या फेरफारापासून वाळू-मुरूम वाहतुकीपर्यंत प्रत्येक व्यवहारात आपला हिस्सा घेतात. प्रत्येक टिप्परमागे आठ हजार रुपयांचा दर ठरलेला आहे, हे जनतेला माहिती आहे. पण लाचलुचपत विभागाला याची काहीच कल्पना नसावी, असं होणं शक्य आहे का? की मग इथेही “वरून” आदेश असतात फलाणा अधिकारी हेरू नका, तो आमचा माणूस आहे!

लाचलुचपत विभागाला असे “आदर्श” तहसीलदार आणि तलाठी नक्कीच भेटू शकतात, पण प्रश्न आहे त्यांना खरंच पकडायचं आहे का? की जाणीवपूर्वक डोळे झाकून बसायचं? काहींवर गुन्हा नोंदवला जातो, काहींवर “तपास सुरू आहे” असं सांगून फाईल बंद होते, आणि काहीजण पुरस्कार घेऊन पुन्हा आपल्या तालुक्यात परत जातात लोकांच्या कामावर पुन्हा दादागिरी करण्यासाठी.

लातूरचं प्रशासन आज एका विचित्र वळणावर आहे. इथे प्रामाणिक अधिकारी मागे पडतात आणि लाचखोर अधिकारी पुढे जातात. “आदर्श” या शब्दाचा अर्थ आता बदललाय  लाच घेतल्याशिवाय काम न करणारा अधिकारीच इथे आदर्श ठरतोय.

प्रशासनाने जर खरंच लोकाभिमुखतेचा दावा करायचा असेल, तर अशा अधिकाऱ्यांवर केवळ गुन्हा नोंदवून थांबू नये  तर त्यांना तात्काळ निलंबित करून सेवा नोंदींची चौकशी करावी. अन्यथा हेच भ्रष्ट अधिकारी उद्या पुन्हा पुरस्कार घेतील, आणि पुन्हा जनतेकडून लाच मागतील.

लातूरला खरे आदर्श हवेत काम करणारे, पारदर्शक, जनतेसाठी उभे राहणारे.

लाच मागणारे नव्हे, लाचखोरी थांबवणारे अधिकारी “आदर्श” म्हणून पुढे यायला हवेत.

कारण लोकांनी आता खोट्या आदर्शांचा मुखवटा फाडण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button