परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई, दोन अधिकारी रंगेहाथ अटकेत.

बेधडक आवाज परभणी – पंचायत समिती पाथरी येथे लाच घेताना दोन सरकारी अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. गटविकास अधिकारी ईश्वर पवार आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गोवर्धन बडे यांच्यावर कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराने झरी ग्रामपंचायतीच्या सात विहिरींसाठी वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी पंचायत समितीत अर्ज केला होता. मात्र, मंजुरीसाठी प्रति विहीर 5000 रुपये याप्रमाणे 35,000 रुपयांची मागणी करण्यात आली. याबाबत तक्रार दाखल होताच एसीबी पथकाने पडताळणी केली. त्यात लाच मागणीची खात्री झाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
तक्रारदाराने पंचायत समिती कार्यालयात जाऊन लाच देण्याचे नाटक केले असता गोवर्धन बडे यांनी पंचासमक्ष पैसे स्वीकारले. त्याच क्षणी एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. चौकशीदरम्यान दोघांच्या घरझडतीत रोख रक्कम जप्त करण्यात आली. ईश्वर पवार यांच्या घरातून 63,000 रुपये तर गोवर्धन बडे यांच्याकडून 8,000 रुपये सापडले.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. आरोपींविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सुरू असून दोघांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.