बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हे दाखल न झाल्यास आत्मदहनाचा इशारा!

लातूर: श्री व्यंकटेश शिक्षण संस्थेतील कथित बनावट कागदपत्र प्रकरणात गुन्हे दाखल न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा एका तक्रारदाराने दिला आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग यांनी 3 फेब्रुवारी 2025 रोजी दिलेल्या सुनावणीतील निर्णयाच्या अनुषंगाने तक्रारदाराने संबंधित कार्यालयात पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, श्री व्यंकटेश शिक्षण संस्थेच्या स्वयंघोषित कार्यकारिणीने बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मान्यता प्रक्रिया पार पाडली. यामध्ये अध्यक्ष सुरेंद्र ब्रिजमोहन अग्रवाल, सचिव प्रशांत शिवाप्पा पटणे आणि राम वसंतराव यादव यांच्यासह तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने यापूर्वी 5 डिसेंबर 2022 रोजी शिक्षण विभागाकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. चौकशी समितीच्या अहवालानंतर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी सुनावणी घेऊन संबंधितांना दोषी ठरवले. मात्र, अद्यापही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने तक्रारदाराने नाराजी व्यक्त केली आहे.
गुन्हे दाखल न झाल्यास आत्मदहनाचा इशारा
गुन्हे दाखल होत नसतील, तर आपण जिल्हा परिषद लातूरच्या आवारात 27 फेब्रुवारी 2025 रोजी आत्मदहन करू, असा इशारा तक्रारदाराने दिला आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत ही कृती होऊ शकते, असेही त्याने स्पष्ट केले आहे. यामुळे संपूर्ण शिक्षण प्रशासन हादरले असून, जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
हा विषय गंभीर असून, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.