लातूरमध्ये गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन; सिलेंडरची ‘अंत्ययात्रा’ काढत केंद्र सरकारचा निषेध

लातूर | प्रतिनिधी
घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दराविरोधात लातूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस भवन ते महात्मा गांधी चौक या मार्गावर गॅस सिलेंडरची प्रतीकात्मक ‘अंत्ययात्रा’ काढून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरला फुलांचे हार घालून बांबूच्या तिरडीवर ठेवले होते. घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा काढला. ‘गॅस दर कमी करा’, ‘महागाई रोखा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी महिला कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात लाकडाची चूल पेटवून त्यावर स्वयंपाक करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. वाढत्या महागाईमुळे गॅस वापरणे कठीण झाले असून पुन्हा पारंपरिक चुलीकडे वळण्याची वेळ येत असल्याचा संदेश यामधून देण्यात आला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी आंदोलनादरम्यान बोलताना सांगितले की, देशातील सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनीही गॅस दरवाढीवर टीका करत महागाईमुळे सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडल्याचे सांगितले. गॅसच्या वाढत्या दराचा परिणाम हॉटेल व्यवसायावरही होत असून, त्यामुळे जेवणाच्या दरातही वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आंदोलनात उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, सपना किसवे, तबस्सुम शेख, सचिन बंडापल्ले, फारुख शेख, अभिषेक पतंगे, मंगेश सोनकांबळे, पवन सोलंकर यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. महागाईमुळे त्रस्त नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले.




