माजी खासदार सुधाकर शृंगारे आणि आमदार अभिमन्यू पवार!

बेधडक आवाज – ( bedhadak awaj ) लातूर जिल्ह्यात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, मजूर, आणि सर्वसामान्य नागरिकांवर नैसर्गिक संकट कोसळले आहे. उभ्या पिकांचे नुकसान, जनावरांचे मृत्यू, घरांची पडझड आणि शेती वाहून जाण्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. शासनाच्या मदतीची वाट पाहत असताना, अनेक लोकप्रतिनिधी केवळ पाहणी, बैठका आणि फोटोसेशनपुरतेच मर्यादित राहिल्याचे चित्र उभे राहिले. पण या सगळ्या गोंधळात दोनच नेत्यांनी पदापेक्षा माणुसकीला प्राधान्य देत शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने मदतीचा हात पुढे केला. माजी खासदार सुधाकर शृंगारे आणि आमदार अभिमन्यू पवार.
सुधाकर शृंगारे हे आता खासदार नाहीत, पण त्यांच्यातील माणुसकी अजूनही शाबूत आहे. विद्यमान खासदार जिथे फोटोसेशन आणि औपचारिकतेत अडकले, तिथे शृंगारे यांनी थेट पूरग्रस्तांच्या दारात जाऊन त्यांना दिलासा दिला. गावागावात फिरत त्यांनी शेतकऱ्यांना अन्नधान्य, आवश्यक साहित्य आणि भावनिक आधार दिला. त्यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले, कारण कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता त्यांनी हे काम केलं. त्यांच्या या कृतीने लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ पद भूषवणारा नव्हे, तर लोकांच्या वेदना ओळखून त्यावर उपाय करणारा माणूस असावा हे दाखवून दिलं. “आजच्या लोकप्रतिनिधींना जमलं नाही, ते माजी लोकप्रतिनिधींनी करून दाखवलं” ही भावना जिल्ह्यातील जनतेच्या ओठावर आहे.
तर दुसरीकडे औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही शेतकऱ्यांसाठी एक संवेदनशील पाऊल उचललं आहे. शासन जितकी मदत देत आहे, तितकीच वैयक्तिकरित्या मदत देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. शासनाने दिलेली नुकसानभरपाई वास्तवात पुरेशी नाही, हे त्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहून ओळखले. ज्या शेतकऱ्यांचा बैल वाहून गेला आहे, त्यांना शासनाकडून ३२ हजार आणि गाय/म्हैस दगावल्यास ३७,५०० रुपये मिळतात. पण आजच्या बाजारभावानुसार नवीन जनावर घेण्यासाठी किमान ७० ते ८० हजार रुपये लागतात. या तफावतीची जाणीव ठेवून पवार यांनी शासनाएवढीच रक्कम स्वतःच्या फाऊंडेशनमार्फत देण्याचा निर्णय घेतला.
ही मदत पात्र नुकसानग्रस्तांना पंचनाम्यांच्या आधारे देण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी औसा येथे विशेष कार्यक्रमात धनादेश आणि अन्नधान्य पॅकेट्स वाटप केले जाणार आहेत. अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट सांगितले की, “ही मदत इतरत्र खर्च न करता ज्या कारणासाठी मिळाली आहे, त्याच कारणासाठी वापरावी. ही माणुसकीच्या विचारातून दिलेली मदत आहे.”
सुधाकर शृंगारे आणि अभिमन्यू पवार या दोघांनीही दाखवून दिलं की राजकारणात सत्ता, पद किंवा प्रसिद्धी यापेक्षा महत्त्वाचं असतं ते माणुसकीचं भान. शेतकऱ्यांच्या संकटात जेव्हा अनेकजण मौन बाळगून बसले होते, तेव्हा या दोघांनी प्रत्यक्ष कृती करून माणुसकीचं राजकारण म्हणजे काय हे दाखवून दिलं.
आज लातूर जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे.या दुष्काळ, पूर आणि संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेले दोनच नेते आहेत सुधाकर शृंगारे आणि अभिमन्यू पवार. पदवी गेली तरी माणुसकी जपणारे हे दोघेच नेते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे आधारस्तंभ ठरले आहेत.




