खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी मंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली भेट.

बेधडक आवाज लातूर:
भारत सरकारचे रेल्वे व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची आज लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी लातूरसाठी विविध विकास प्रकल्पांसाठी मागण्या मांडल्या.
प्रसारण क्षेत्रात लातूर जिल्ह्याच्या गरजांना ओळखून नवीन आकाशवाणी/एफएम केंद्र स्थापनेची मागणी करण्यात आली. आकाशवाणी केंद्रामुळे लातूरच्या सांस्कृतिक व सामाजिक विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक कलावंत, श्रोते व विविध विषयांवरील चर्चांना अधिक व्यासपीठ उपलब्ध होईल.
याच बरोबर रेल्वे क्षेत्रातही महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. लातूर रोड ते नांदेड आणि लातूर रोड ते बोधन या नवीन रेल्वेमार्गांच्या विकासासाठी प्रस्ताव मांडला गेला. हे मार्ग लातूरच्या दळणवळणात सुधारणा करून नांदेड व बोधन या क्षेत्रांशी संपर्क अधिक सुकर करतील.
तसेच वैष्णोदेवी, नवी दिल्ली, अजमेर आणि तिरुपती यांसारख्या लोकप्रिय धार्मिक व व्यावसायिक स्थळांसाठी नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली. ही गाड्या सुरू झाल्यास प्रवाशांना सोयीचा प्रवास व लातूरचा इतर राज्यांशी संपर्क अधिक दृढ होईल.
याशिवाय, कोल्हापूर-नागपूर रेल्वे दररोज चालवणे, लातूर-पुणे इंटरसिटी नियमित करणे, तसेच मुंबई, पुणे व हैदराबादसाठी वंदे भारत एक्सप्रेसची जोडणी उपलब्ध करून देणे या मागण्याही करण्यात आल्या. या मागण्या पूर्ण झाल्यास लातूरच्या दळणवळणाला नवी दिशा मिळेल आणि व्यापारी, शैक्षणिक तसेच सामाजिक प्रवासासाठी अधिक संधी निर्माण होतील.
या मागण्यांमुळे लातूरसारख्या शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळू शकते. आकाशवाणी केंद्रामुळे स्थानिक आवाजाला प्रोत्साहन मिळेल, तर रेल्वे प्रकल्पांनी शहराला नवे प्रवासी व व्यापारी आयाम मिळतील. लातूरचे दळणवळण अधिक चांगले होण्यासाठी ही प्रकल्पे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतात. मंत्री वैष्णव यांच्याकडून या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.