नांदेड जिल्ह्यातून चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी अटकेत, तीन फरार.

बेधडक आवाज नांदेड: एमएसईबीच्या ॲल्युमिनियम वायर चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना नांदेड जिल्ह्यातील माळटेकडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 6.09 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू असताना, अहमदपूर, चाकूर व उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या ॲल्युमिनियम वायर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी नांदेड जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार, 8 मार्च 2025 रोजी पोलिसांनी माळटेकडी येथे छापा टाकून दोन आरोपींना अटक केली. अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- संदीप लक्ष्मण गायकवाड (वय 25, रा. पुणेगाव, ता. नांदेड)
- शेषराव शामराव वाघमारे (वय 26, रा. पांगरी तामसा, ता. हादगाव, जि. नांदेड, सध्या रा. पुणेगाव)
त्यांच्याकडील चौकशीत, लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या एमएसईबी ॲल्युमिनियम वायर चोरीच्या गुन्ह्यांत इतर तीन साथीदारांचा सहभाग असल्याचे उघड झाले. हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत:
3) सचिन आनंदराव कांबळे (रा. माळटेकडी, ता. नांदेड, सध्या रा. पंचशील नगर, पूर्णा, जि. परभणी)
4) बादल अशोक गायकवाड (रा. रमाबाई आंबेडकर चौक, अंबड, जि. जालना)
5) आदिनाथ मनोहर मोरे (रा. सुमठाणा, ता. वसमत, जि. हिंगोली)
अटक आरोपींनी चोरी केलेल्या 2.84 लाख रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम वायरचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले. एकूण 6.09 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, अटक आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी अहमदपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले आणि पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.