घरफोडी प्रकरणातील तिघांना अटक – 4.65 लाखांचा मुद्देमाल जप्त.

Bedhadak awaj -लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील तिघा सराईत आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून 4 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
18 ते 21 फेब्रुवारी 2025 दरम्यान कातपूर रोड, लातूर येथील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडेकर करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला आणि तिघांना ताब्यात घेतले.

अटक आरोपींची नावे विजय बापू काळे (24), नागेश गणपत धोत्रे (23) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालक अशी आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या तपासादरम्यान आरोपींनी एकूण 7 घरफोड्यांची कबुली दिली. या गुन्ह्यांचा तपास करत विवेकानंद चौक पोलिसांनी 4.65 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोउपनि सचिन रेडेकर आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.