भररस्त्यात तरुणाला बेदम मारहाण, पाच जणांविरोधात शोधमोहीम सुरू.

Bedhadak awaj लातूर : शहरातील अंबेजोगाई रोडवर भरदिवसा तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना राजश्री बारजवळ घडली असून, मारहाणीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेचा थरार

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजश्री बारमध्ये काही तरुण दारू पित बसले होते. बारमध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. वाद विकोपाला जाऊन एका तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटलीने हल्ला करण्यात आला. त्यानंतर हे भांडण बारच्या बाहेरही सुरूच राहिले. अंबेजोगाई रोडवर पाच जणांनी एका तरुणाला काठी, दगड आणि बेल्टने जबर मारहाण केली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
पोलिसांचा तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी जखमी तरुणाला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे गोळा केले असून, मारहाण करणारे पाच जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समोर आले आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचे मोबाईल कॅमेऱ्यात शूट केलेले व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या प्रकारामुळे लातूर शहरात गुन्हेगारी वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी शिवाजीनगर, एमआयडीसी आणि गांधी चौक पोलिसांची पथके कार्यरत असून लवकरच आरोपींना अटक केली जाण्याची शक्यता आहे.