
लातूर हे शैक्षणिक शहर म्हणून ओळखले जात असले तरी, सध्या गुन्हेगारी घटनांमुळे त्याची प्रतिमा मलीन होत असल्याचे दिसून येत आहे. भर दुपारी, भर रस्त्यात एका युवकाला सात ते आठ जणांनी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
काय आहे प्रकरण?
लातूरच्या ट्युशन एरियातून तयार झालेल्या टोळ्यांमधील संघर्ष आता रस्त्यावर उघडपणे दिसू लागला आहे. आकाश होदाडे, आशिष रेड्डी, अक्षय कोद्रे यांच्या टोळीचा वाद अजिंक्य मुळे, नितीन भालके, अक्षय कांबळे यांच्या टोळीशी होता. हे वाद कायम सुरू असल्याने ते मिटवण्यासाठी दोन्ही टोळीचे सदस्य राजश्री हॉटेलमध्ये एकत्र आले. या ठिकाणी 15 ते 17 जण मद्यपान करत होते, आणि त्यांचे बिल सात हजार रुपयांहून अधिक झाले.

हॉटेलमधून बाहेर पडताना एका व्यक्तीने दुसऱ्याला चापट मारली आणि येथूनच भांडणाला सुरुवात झाली. अजय चिंचोले या तरुणाला अजिंक्य मुळे, नितीन भालके, अक्षय कांबळे, जगताप, प्रणव संधीकर आणि सोहेल यांनी हॉटेलबाहेर आणून अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे लातूर-आंबेजोगाई रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले.
मारहाण करणाऱ्यांची पोलिसांनी वरात काढली
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे आणि गांधी चौक पोलीस ठाण्याचे पथक तातडीने कार्यरत झाले. तीन तासांत चार आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये ऋषिकेश सोनटक्के, बालाजी जगताप, अजिंक्य मुळे आणि अक्षय कांबळे यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांनी आरोपींना ज्या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणाहून पोलीस ठाण्यापर्यंत मारत आणले. मात्र, एवढ्यावरच हा प्रकार थांबणार नाही, कारण यातील अनेक आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी
आकाश होदाडे – 15 ते 20 गुन्हे दाखल
अक्षय कोद्रे – 10 पेक्षा अधिक गुन्हे
आशिष रेड्डी – अनेक गुन्हे दाखल, सध्या फरार
अजय चिंचोले (जखमी) – याच्यावरही गुन्हे दाखल
अक्षय कांबळे – 10 पेक्षा अधिक गुन्हे
अजिंक्य मुळे – 5 दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला, 20 पेक्षा अधिक गुन्हे
नितीन भालके – 15 गुन्हे दाखल
जगताप, प्रणव संधीकर, सोहेल – यांच्यावरही गुन्हे दाखल
लातूरच्या ट्युशन एरियात गुन्हेगारी वाढली?
यातील जवळपास 90 टक्के गुन्हेगार लातूरच्या ट्युशन एरियामध्ये दादागिरी करत मोठे झाले आहेत. हे लोक हातात शस्त्रे बाळगतात, अवैध मार्गाने पिस्तुल मिळवतात आणि शेती व प्लॉटच्या कब्जासाठी मारामाऱ्या करतात. सुपारी घेऊन एखाद्याचा खून करणे, लोकांना धमकावणे आणि पैशांसाठी मारहाण करणे हे प्रकार हे सर्रास करतात.