क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रशिक्षण

लातूर शहरातील 28 कॉफी शॉपवर पोलिसांची कारवाई; बंदिस्त कंपार्टमेंटवर लाठी.

लातूर, 09 एप्रिल 2025 – लातूर शहरात अनधिकृत पद्धतीने चालणाऱ्या व नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कॉफी शॉपवर पोलिसांनी कारवाईची काठी उगारली आहे. शहरातील 28 कॉफी शॉपवर अचानक धाड टाकत विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली. या कारवाईत 3 कॉफी शॉपमधील बंदिस्त कंपार्टमेंट तत्काळ तोडण्यात आले असून, 10 कॉफी शॉप मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

ही मोहीम पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या नेतृत्वात पार पडली. शहरातील चार पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि त्यांच्या पथकांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कॉफी शॉपमध्ये बंदिस्त कंपार्टमेंट तयार करून त्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या कॉफी शॉप चालकांवर भारतीय न्याय सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 168 अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाहीही सुरू आहे.

कॉफी शॉपसाठी नियमावली जाहीर

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले की, 20 जून 2023 पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कॉफी शॉप व हॉटेलसाठी एक नियमावली लागू करण्यात आली आहे. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

  1. सीसीटीव्ही फुटेज अनिवार्य
  2. पारदर्शक काचेचे दरवाजे
  3. स्पष्ट बैठक व्यवस्था
  4. कोणतेही बंदिस्त कंपार्टमेंट नसावेत
  5. अधिकाऱ्यांसाठी भेट पुस्तिका उपलब्ध असावी
  6. ध्वनी क्षेपक नियमांचे पालन
  7. धूम्रपानास सक्त मनाई
  8. शासनाच्या वेळेनुसारच शॉप चालू ठेवणे

या नियमांचे पालन न करणाऱ्या शॉपवर भविष्यात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button