औसा रोडवर गुन्हेगारीचा कहर – भरदिवसा मारहाणीप्रकरणी सात आरोपींवर मोक्का; लातूर पोलिसांची मोठी कारवाई.

लातूर दि –12 एप्रिल 2025
शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या भरदिवसाच्या मारहाणीप्रकरणी लातूर पोलिसांनी मोठी कारवाई करत सात सराईत गुन्हेगारांविरोधात “महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का)” अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही टोळी मागील अनेक वर्षांपासून औसा रोड परिसरात गुन्हेगारीचं जाळं विणत असल्याचे समोर आलं आहे.
सदर घटनेत किरकोळ कारणावरून एका तरुणास भर रस्त्यात अमानुष मारहाण करण्यात आली होती. यानंतर संबंधित टोळीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या टोळीतील बहुतांश आरोपी हे याआधी हद्दपारी, झोपडपट्टी दादा कायदा, स्थानबद्धता अशा विविध कायद्यांतर्गत अडकल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कोण आहेत आरोपी?
- अजिंक्य निळकंठ मुळे (28), लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड
- बालाजी राजेंद्र जगताप (27), गायत्री नगर
- अक्षय माधवराव कांबळे (28), दत्तकृपा सोसायटी
- एक विधीसंघर्षग्रस्त बालक
- नितीन शिवदास भालके (28), आदर्श कॉलनी
- साहिल रशीद पठाण (24), ड्रायव्हर कॉलनी
- प्रणव प्रकाश संदीकर (27), लक्ष्मी कॉलनी
या आरोपींनी मागील 10 वर्षांपासून तलवार, कु-हाड, गावठी पिस्तूल यासारख्या घातक शस्त्रांचा वापर करत गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची माहिती आहे. त्यांच्याविरोधात लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
मोक्काची मंजूरी व पुढील तपास
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या शिफारशीनुसार पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांनी मोक्काची मंजूरी दिली. आता या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्याकडे देण्यात आला असून पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
औसा रोडवर गुन्हेगारीचे सावट – जबाबदार कोण?
लातूरमधील औसा रोड परिसर गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीच्या दृष्टीने ‘हॉटस्पॉट’ बनलेला आहे. अनेक सराईत गुन्हेगार, टोळ्यांचे निर्माण, आणि वारंवार घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. इतक्या गंभीर घटनांनंतरही या भागात कठोर पोलीस गस्त किंवा धोरणात्मक उपाययोजना का केल्या जात नाहीत? स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलं आहे का, हाही महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो.
औसा रोडवरील वाढती गुन्हेगारी केवळ टोळ्यांचीच नाही, तर प्रशासनाच्या दुर्लक्षाचीही साक्ष देत आहे. यासाठी जबाबदार कोण? याची उत्तरे शोधण्याची वेळ आता आली आहे.