बांधकाम कामगारांसाठी लातूर शहरात हक्काची जागा व मोफत आरोग्य सेवेची मागणी.

लातूर: लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गंजगोलाई येथे बांधकाम कामगार रोजंदारीच्या प्रतिक्षेत उघड्यावर थांबत असतात. या कामगारांना योग्य त्या सुविधांसह हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच लातूरसह जिल्ह्यातील इतर लहान शहरांतील आणि ग्रामीण भागातील कामगारांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात आली.

या मागणीला उत्तर देताना कामगार कल्याण मंत्री आकाश फुंडकर यांनी लातूर शहरातील कामगारांसाठी आवश्यक त्या सुविधांसह जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, लातूर आणि इतर शहरांतील तसेच ग्रामीण भागातील कामगारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्यसेवा मिळावी यासाठी संबंधित विभागांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.