ब्लॅक बेल्ट चॅम्पियन प्रदीप निपटेची गूढ हत्या: डोक्यापासून छातीपर्यंत तब्बल १७ वार

छत्रपती संभाजीनगर :-
उस्मानपुऱ्यातील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या १९ वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या विद्यार्थ्याची हत्या हा परिसरातील लोकांसाठी मोठा धक्का ठरला आहे. कराटे आणि ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवणारा हा विद्यार्थी शांत स्वभावाचा आणि अंगकाठीने बारीक होता. त्याची हत्या इतकी क्रूर पद्धतीने झाली, की डोक्यापासून छातीपर्यंत तब्बल १७ वार केल्याचे समोर आले आहे.
प्रदीप सहा महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आला होता. दशमेश नगरमधील खोली सोडून दहा दिवसांपूर्वी तो उस्मानपुऱ्यातील म्हाडा कॉलनीच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये राहायला आला होता. मंगळवारी सायंकाळी त्याचे रूममेट विविध कामांसाठी बाहेर गेले होते. रात्री ९:३० वाजता ते परतल्यानंतर प्रदीप आपल्या खोलीत झोपलेला असल्याचे दिसून आले. मात्र, १०:३० वाजता जेवणासाठी आवाज दिल्यानंतर, त्याला मृतावस्थेत आढळून आले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मारेकऱ्याने घराचा उघडा दरवाजा पाहून आत प्रवेश केला असावा आणि झोपेतच प्रदीपवर वार केले असावेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, वार एका धारदार शस्त्राने करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हत्येनंतर मारेकऱ्याने प्रदीपचा मोबाईलही सोबत नेला, जो सायंकाळी ६:५५ वाजता बंद झाला होता.
प्रदीपच्या हत्येच्या गुन्ह्यात संभाव्य वाद, मैत्रिणींसोबतचे व्यक्तिगत मुद्दे, किंवा लुटमारीचा उद्देश याचा तपास सुरू आहे. सहायक पोलीस आयुक्त डॉ. रणजीत पाटील आणि त्यांच्या चार पथकांकडून चौकशी केली जात आहे. परिसरातील जवळपास २० मित्रांची चौकशी केली जात असून, या हत्येच्या गूढ उकलण्यावर सर्वांचे लक्ष आहे.
प्रदीपच्या बलाढ्य क्रीडा कौशल्यामुळे त्याच्यावर अशी हल्ला होणे शक्य नसल्याचे म्हणत, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिस तपास जलद गतीने सुरू असून, लवकरच या क्रूर हत्येचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.