लातूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव: कन्या प्रशालेची उत्कृष्ट कामगिरी, जिल्ह्याचे पहिले व विभागाचे दुसरे बक्षीस पटकावले.

बेधडक आवाज लातूर :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन शाहू महाविद्यालय येथे करण्यात आले होते.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे होते. तसेच उपप्राचार्य सदाशिव शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैय्या, व परीक्षक प्राचार्य डॉ. राम बोरगावकर यावेळी उपस्थित होते.या युवा महोत्सवात कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी आपली उत्कृष्ट कामगिरी सादर करून जिल्ह्याचे पहिले व विभागाचे दुसरे बक्षीस पटकावले. विद्यार्थिनींच्या कलागुणांना आणि सादरीकरणाला परीक्षकांनी भरभरून दाद दिली.
या यशामुळे कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले असून संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडा व युवा अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी कौतुक व्यक्त केले.
युवा महोत्सवाने युवक-युवतींमध्ये उत्साह निर्माण केला असून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी स्पर्धा उपयुक्त ठरत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.