
Bedhadak awaj |28 jun 2025
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला ‘छोटा पुढारी’ उर्फ घन:श्याम दरोडे याच्या निधनाच्या अफवांमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. त्याचा हार घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. अनेकांनी श्रद्धांजली वाहत पोस्ट शेअर केल्या. काहींनी भावनिक संदेश लिहिले, तर काहींनी संशय व्यक्त केला. या सगळ्या गोंधळावर अखेर खुद्द घन:श्याम दरोडेंनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
घन:श्यामने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात तो अगदी ठामपणे म्हणतो की, “मी जिवंत आहे, मी ठिक आहे. माझ्या मृत्यूची अफवा खोटी आहे.” या व्हिडीओत तो पुढे म्हणतो, “कधी लोकांनी मला ट्रोल केलं, काहींनी प्रेम दिलं. पण माणूस मेल्यावरच लोक त्याच्या मागे चांगलं बोलतात, हे आज कळालं. मला काही झालेलं नाही. दोन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता, पण आता मी पूर्ण बरा आहे.”

या अफवेच्या पार्श्वभूमीवर त्याने स्पष्ट सांगितलं की, “कोणीतरी त्यांच्या अकाऊंटवरून पोस्ट केली की मला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. आणि माझी अशी अफवा पसरवणाऱ्याला एकच सांगणं आहे – माझ्या बाबतीत हे केलंत, पण दुसऱ्याच्या बाबतीत असं करु नका. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे.”
या संपूर्ण प्रकारानंतर घन:श्यामने एक हटके स्टाईलमध्ये व्हिडीओच्या शेवटी त्याच्या फोटोसह तयार केलेलं एक पोस्टर दाखवलं आहे, ज्यावर लिहिलं होतं – “पुढाऱ्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्याला पुढाऱ्यांनी शोधून काढत वाहिली आदरांजली.” यासोबत कॅप्शनमध्येही त्याने लिहिलं, “मला श्रद्धांजली वाहणाऱ्याला शोधून काढलं.”
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, घन:श्याम दरोडेंनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार देखील दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन सोशल मीडिया चॅनेलवरून जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करणारे व्हिडीओ अपलोड करण्यात आले. त्यामुळे त्यांनी या अफवा थांबवण्यासाठी अधिकृतरीत्या पोलिसांत धाव घेतली आहे.
घन:श्याम सध्या पूर्णपणे ठणठणीत असून, चाहत्यांनी काळजी न करण्याचं आवाहनही त्याने केलं आहे. तो म्हणतो, “मी बोलतोय, चालतोय आणि तुमच्या प्रेमामुळे खंबीरपणे लढतोय.”