हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची शपथ.

Bedhadak awaj मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मंगळवारी (दि. 18 फेब्रुवारी 2025) पदभार स्वीकारला. मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात झालेल्या या समारंभात पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सपकाळ यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, त्यांच्या कार्यशैलीमुळे पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्यासोबत राहू, असे आश्वासन दिले.
याच समारंभात विजय वडेट्टीवार यांच्या विधिमंडळ नेतेपदी निवडीबद्दलही त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या कामामुळे जनतेमध्ये पक्षाबद्दल अधिक विश्वास वाढेल, असे देशमुख यांनी नमूद केले.
मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेनिथला यांच्या योगदानाचाही गौरव या वेळी करण्यात आला. पक्षाच्या भविष्यासाठी नवे नेतृत्व सक्षमपणे वाटचाल करेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
“एकत्र येऊन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काम करूया,” असे आवाहन देशमुख यांनी या वेळी केले.