
Bedhadak awaj लातूर, 18 फेब्रुवारी – पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या पाचव्या राज्यस्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत आठ पदकांची कमाई केली. या विजयी खेळाडूंचा सत्कार स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे तायक्वांदो ऑर्गनायझेशन व योगीराज तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयोजनात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून तब्बल दोन हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. लातूरच्या पाच खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेत क्युरोगी व पुमसे प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत तीन रजत आणि पाच कास्य अशी आठ पदके पटकावली.
आज, 18 फेब्रुवारी रोजी सकाळी श्री केशवराज विद्यालय, लातूर येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. सत्कारित खेळाडूंमध्ये आरोही मंचक राऊतराव, श्रावणी संजय खडबडे, अहिल अमजद पठाण, विनय महेश वळसंगे, श्रीगणेश संजय खडबडे यांचा समावेश होता, तसेच प्रशिक्षक धनश्री संजय मदने यांचाही सत्कार करण्यात आला.
या खेळाडूंना आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पंच मास्टर नेताजी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तायक्वांदो पंच आणि प्रशिक्षक जानवी विनोद मदने, एस. व्ही. कुलकर्णी आणि अन्य खेळाडू यावेळी उपस्थित होते. लातूरच्या खेळाडूंच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.