

लातूर | दि. १३ जून २०२५
जिल्ह्यात अवैध धंद्यांवर बंदोबस्त घालण्यासाठी सुरू असलेल्या “अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान-२” अंतर्गत लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सुमारे ३ लाख ४९ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात पथकाने १२ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजता लातूर शहरातील जाफर नगर भागातील एका किरायाच्या घरावर छापा टाकला. यावेळी महाराष्ट्र शासनाने विक्रीस प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला.
जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित मुद्देमाल ३ लाख ४९ हजार ४२० रुपयांचा असून, तो विक्रीसाठी अवैधरित्या साठवून ठेवण्यात आला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी जखियोदिन रफीयोदिन सय्यद (वय ४८, रा. रियाज कॉलनी, लातूर) या इसमाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार रियाज सौदागर, मनोज खोसे, युवराज गिरी, मुन्ना मदने, गोविंद भोसले, विनोद चलवाड आणि बंडू नीटुरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
पोलीस प्रशासनाच्या या तत्परतेमुळे लातूरमधील अवैध गुटखा साखळीला मोठा दणका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.