शिवसेना OBC/VJNTचा मनपाला इशारा “मराठी अस्मितेचा अपमान खपवून घेणार नाही”.


लातूर | जुना रेणापूर नाका परिसरातील नवीन बसस्थानक परिसरातील चौकास सरसेनापती महाराजा यशवंतराव होळकर यांचे नाव देण्यास लातूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. परंतु, काही व्यक्तींनी या निर्णयाला जाणीवपूर्वक विरोध सुरू केला असून, या विरोधामुळे मराठी जनतेच्या अस्मितेला ठेच पोहोचत आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना OBC/VJNT लातूर जिल्हा वतीने मनपा आयुक्तांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात चौकाच्या नामकरणास दाद देताना, मराठी समाजाच्या अस्मितेशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा अवमान सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. “जर कोणी जाणीवपूर्वक मराठी समाजाच्या अस्मितेशी खेळ करत असेल, तर OBC समाज शांत बसणार नाही,” असा इशारा शिवसेना OBC/VJNT लातूर जिल्हाप्रमुख विशाल भैया देवकते यांनी दिला.ते पुढे म्हणाले, “शिवसेना ही नेहमीच सर्व महापुरुषांचा आदर करणारी संघटना आहे. आजही आम्ही त्या परंपरेशी निष्ठावान आहोत. इतर ठिकाणी देखील महापुरुषांच्या नावाने चौक नामकरणाच्या लढ्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ. पण जर कोणी हेतुपुरस्सर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वातावरण बिघडवत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही त्या विरोधकांच्या विरोधात ताकदीने उभे राहू.”सरसेनापती यशवंतराव होळकर हे ‘भारताचे नेपोलियन’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावाने चौकाचे नामकरण होणे, हे संपूर्ण मराठी जनतेसाठी अभिमानाची बाब असून, त्यावर अनाठायी व राजकीय हेतूने विरोध होणे, हे खेदजनक असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले.या आंदोलनातून शिवसेनेने पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि समाजाभिमानाचे ठाम नेतृत्व केले आहे.