लातूरमध्ये अवैध दारू धंद्यांवर पोलिसांचा मोठा छापा, 83 जणांवर कारवाई.

Bedhadak awaj -लातूर जिल्ह्यात अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 83 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या छाप्यात 5 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू आणि रसायन नष्ट करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार, अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून 16 फेब्रुवारी रोजी पहाटे मोठ्या प्रमाणात छापे टाकण्यात आले. या मोहिमेत 32 पोलीस अधिकारी आणि 118 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लपून-छपून हातभट्टी तयार करणारे तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये हातभट्टी दारू, त्याचे रसायन तसेच मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. लातूर पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.