बोगस सही–शिक्क्याने बनवलेले नियुक्ती आदेश; मनपा प्रशासन व पोलिसांची धावपळ.

लातूर : लातूर महानगरपालिकेत लिपिक पदाच्या सहा बनावट नियुक्त्या दिल्याचा धक्कादायक प्रकार आरटीआयमधून उघडकीस आला आहे. प्रशासनाला हादरा देणारा हा घोटाळा एवढा गंभीर आहे की ज्या उमेदवारांना ही नियुक्तीची ऑर्डर मिळाली, त्यांनीच शंका आल्याने माहितीच्या अधिकारात चौकशी मागितल्यानंतर संपूर्ण प्रकार बाहेर आला. शुभम बाळासाहेब गरड, ज्ञानेश्वरी रवी गरड, मारुती भगवान शिवणे, आदित्य बंकट भिंगे, सोमनाथ लक्ष्मण पांचाळ आणि बापूराव कोंडिराम हुडे या सहा उमेदवारांना मनपातील लिपिकपदासाठी नियुक्ती आदेश दिले गेले होते. मात्र, आरटीआयच्या उत्तरात मनपाने स्पष्ट केले की त्यांच्याकडे या नियुक्त्यांची कोणतीही नोंद उपलब्ध नाही. याचा थेट अर्थ, हे सर्व नियुक्ती आदेश पूर्णपणे बोगस आहेत.सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तापडे आणि आस्थापना विभागप्रमुख अभिमन्यू पाटील यांच्या प्राथमिक चौकशीत या आदेशांवर मनपा आयुक्त मानसी मीना यांच्या बनावट सही आणि शिक्क्याचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही कारवाई कोणत्या व्यक्ती किंवा गटाने केली, कोणत्या मार्गाने उमेदवारांपर्यंत आदेश पोहोचवले गेले आणि या मागे कोणते रॅकेट सक्रिय आहे, याबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे.घोटाळा उघड झाल्यानंतर मनपा प्रशासनाने तात्काळ धाव घेत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची औपचारिक तक्रार दाखल केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी तपास सुरू केला असून बनावट सही–शिक्का कोणी तयार केला, नियुक्ती आदेश कोणी दिले आणि या सर्वाचा उद्देश काय होता, याचा शोध घेतला जात आहे.आस्थापना विभागप्रमुख अभिमन्यू पाटील यांनी स्पष्ट केले आहे की त्यांच्या विभागातून अशा कोणत्याही नियुक्त्या निर्गमित करण्यात आलेल्या नाहीत. उमेदवारांना मिळालेले आदेश कोणी दिले, याची माहिती संबंधितांनाच अधिक स्पष्ट माहीत असेल. मनपा प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपासातून संपूर्ण सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी सांगितले.या घटनेमुळे मनपा प्रशासनातील दस्तऐवज सुरक्षा, शिक्के-सहीचे नियंत्रण आणि अंतर्गत प्रणालीतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. सहा उमेदवारांपर्यंत बनावट आदेश सहज पोहोचल्याने मनपाच्या व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची नागरिकांकडून मागणी होत आहे.




