“तुला मारणार नाही, मोदींना जाऊन सांग — पल्लवींचा धक्कादायक खुलासा”

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेत 10 हून अधिक लोक जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील मंजूनाथ या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मंजूनाथ त्याची पत्नी पल्लवी आणि लहान मुलासह काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. जाऊन मोदींना सांगा…
मंजूनाथ याची पत्नी पल्लवी यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यावेळी काय घडलं याबाबत माहिती दिली. आम्ही तीन जण, मी, माझे पती आणि आमचा मुलगा काश्मीरला गेले होते. हा हल्ला दुपारी दीड वाजताच्या सुमारास झाला. आम्ही पहलगाममध्ये होतो, माझ्या डोळ्यासमोर पतीला मारलं, असं पल्लवी यांनी सांगितलं. ही घटना एका वाईट स्वप्नासारखी होती, असंही त्या म्हणाल्या. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदत केल्यानं जीव वाचल्याचं त्यांनी म्हंटलं. पल्लवी यांच्या माहितीनुसार दहशतावादी नाव विचारुन हिंदूंना लक्ष्य करत होते. तीन चार लोकांनी पर्यटकांवर हल्ला केला. पल्लवी म्हणाल्या की, मी त्या दहशतवाद्यांना म्हटलं की मलापण मारा, तुम्ही माझ्या पतीला पहिल्यांदा मारलं, त्यावर त्यापैकी एकानं तुला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा म्हटल्याचं पल्लवी यांनी सांगितलं.
पतीचा मृतदेह लवकर देण्याची विनंती
पल्लवी यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली की पतीचा मृतदेह लवकर शिवमोगा इथं आणला जावा. त्यांनी म्हटलं की मृतदेह खाली आणण्यात अनेक अडचणी आहेत. हवाई मार्गे मृतदेह घेऊन जाण्याची गरज आहे. मृतदेह लवकर परत आणावा, असं पल्लवी म्हणाल्या. हल्ल्या अगोदर मंजूनाथ आणि पल्लवी यांनी दाल सरोवरात शिकारा राइड केली होती, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन भ्याड दहशवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. कन्नड लोक या घटनेतील पीडितांपैकी आहेत. आम्ही एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत घटनेची माहिती घेतली आहे. दिल्लीतील निवासी आयुक्तांसोबत चर्चा केली असून त्यांना घटनाक्रमावर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय मंत्री अमित शाह श्रीनगरमध्ये दाखल झाले असून सध्या त्यांची जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत बैठक सुरु असल्याची माहिती आहे. पहलगाममध्ये एका टेकडीवर ट्रेकिंगसाठी पर्यटक जातात. त्याच ठिकाणी जंगलात लपलेल्या अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातून या घटनेची माहिती घेतली आहे.