मराठा मावळा संघटनेणे निवेदनाद्वारे केली मागणी.

लातूर, दि. १ ऑक्टोबर २०२५ (प्रतिनिधी) –
अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णपणे नेस्तनाबूत झाला असून त्याच्या हाती सध्या कसलेही साधनसामुग्री उरलेले नाही. या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पन्नास हजार रुपये जमा करावेत, अशी ठाम मागणी मराठा मावळा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेने आज जिल्हाधिकारी लातूर यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करताना शेतकऱ्यांच्या अडचणी आणि सरकारकडून अपेक्षित उपाययोजनांची जाणीव करून दिली.
या निवेदनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजबिल माफी, बँक वसुली थांबविणे, शेतकऱ्यांचे विजकनेक्शन तोडू न देणे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच मुंबईत समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक त्वरीत पूर्ण करावे, महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या राखीव ठेवणारा शासन निर्णय अंमलात आणावा, कृषी उत्पन्न बाजार समितींना अनुदान देऊन शेतकरी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची उभारणी करावी तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्जप्रकरणे त्वरित मंजूर करावीत, अशा विविध मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.

सरकारने जर १४ ऑक्टोबरपर्यंत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत मराठा मावळा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नंदकिशोर साळुंके, विजय कदम, रामभाऊ पवार, प्रशांत सुरवसे, किशोर शिंदे, ऋषिकेश सावंत, सागर सूर्यवंशी, रुद्रा पाटील, आकाश जाधव, विश्वा गिरी आणि ज्ञानेश्वर घोगरे यांच्यासह अनेक मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.




