अल्पवयीन मुलीवर तीन महिने अत्याचार; सहा महिन्यांनंतर उघडकीस आलेली घटना लातूर जिल्ह्यात खळबळ उडवणारी.

प्रतिनिधी | औसा | १ जून २०२५
औसा तालुक्यातील एका शेतात काम करणाऱ्या सालगड्याच्या अल्पवयीन मेहुणीवर शेतमालकाने सलग तीन महिने अत्याचार केल्याची संतापजनक घटना तब्बल सहा महिन्यांनंतर उघडकीस आली असून, पीडित मुलगी सध्या सहा महिन्यांची गरोदर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना आणि भाऊजीसह बहिणीला जीवे मारण्याच्या धमक्या देत आरोपीने पीडितेच्या तोंडाला कुलूप घातले होते.

घटनेची गंभीरता लक्षात घेत, पीडितेच्या आईने वैद्यकीय तपासणी केली असता गरोदरपणाची बाब समोर आली. त्यानंतर तिने थेट औसा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी ३० मे रोजी रात्री ११ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक 0217/2025 अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अंतर्गत कलम 64 (2)(I), 64 (2)(M), 351(2), 351(3), अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3 (2)(5), तसेच पोक्सो कायद्यानुसार कलम 4, 8, 12 अंतर्गत जबरी बलात्कार व अत्याचाराचे गुन्हे नोंदवले आहेत.
दरम्यान, आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पीडित मुलगी व तिचे कुटुंब हादरले असून, या प्रकरणामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः मातंग समाजामध्ये या अमानवी कृत्याविरोधात तीव्र रोष असून, आरोपीला तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणाने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला असून, पोलिस प्रशासनाची जबाबदारी अधिक तीव्र झाली आहे. पुढील तपास औसा पोलीस करत असून आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.