६ जून २०२५ रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार.

प्रतिनिधी | लातूर दि /02/06/2025
भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याचा दिवस मानला जाणारा ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा यावर्षी ५ व ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यास युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
६ जून १६७४ रोजी रायगडावर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. याच ऐतिहासिक क्षणाची स्मृती जपण्यासाठी प्रतिवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन होते. यावर्षी हा सोहळा ‘लोकोत्सव’ स्वरूपात साजरा होणार असून ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा’ आणि ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे विशेष आकर्षण ठरणार आहेत.

५ जून रोजी दुपारी ३.३० वाजता पाचाड येथील राजमाता जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर युवराज संभाजी छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे नाणे दरवाजापाशी स्वागत होईल आणि शिवभक्तांच्या समवेत गडचढाईला प्रारंभ होईल. नगारखान्यावर गडपूजन, होळीच्या माळावर युद्धकलेचे प्रात्यक्षिक, ढोल-ताशांचे निनाद, लेझीम पथकांचे सादरीकरण आणि रात्री राजसदर येथे ‘जागर शिवशाहीरांचा’ कार्यक्रम पार पडणार आहे. शिरकाई देवीचा गोंधळ आणि कीर्तन-भजनाच्या माध्यमातून गडावर भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे.
मुख्य सोहळा ६ जून रोजी सकाळी ७ वाजता नगारखान्यावर ध्वजपूजनाने सुरू होईल. त्यानंतर शाहिरी कार्यक्रम होईल आणि शिवछत्रपतींच्या पालखीचे राजसदरवर आगमन होईल. सकाळी १० वाजता युवराज संभाजी छत्रपती यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या उत्सवमूर्तीस सुवर्णमुद्रांनी अभिषेक करण्यात येईल. यानंतर त्यांचे शिवभक्तांना संबोधन होईल आणि ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या संकल्पनेखाली पालखी मिरवणुकीला सुरुवात होईल. दुपारी जगदीश्वर मंदिर येथे पालखी पोहोचेल आणि युवराज संभाजी छत्रपती यांच्या हस्ते वारकरी संप्रदायास पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान केला जाईल.
हा संपूर्ण सोहळा केवळ ऐतिहासिक क्षणाची आठवण नसून, स्वराज्य, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या शौर्यतेचा जागर ठरणार आहे. राज्यभरातून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होण्याची शक्यता असून, इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पर्वणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे आवाहन आयोजकांनी सर्वांना केले आहे.