
बेधडक आवाज लातूर, 28 जानेवारी:
कु. गीतांजली रवींद्र नागरगोजे हिने राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत आपल्या कौशल्याने चमक दाखवत पदक जिंकले आहे. ती रिलायन्स लातूर पॅटर्नची प्रमुख खेळाडू असून श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे आयोजित या स्पर्धेत तिने उल्लेखनीय कामगिरी केली. या यशानिमित्त प्रजासत्ताक दिनी श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय लातूरतर्फे गीतांजलीला स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
याचसोबत, या स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या कु. रागिनी मारुती क्षीरसागर हिचा देखील सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी संस्थाचालक उमाकांत होनराव, कोषाध्यक्ष प्रेरणा होनराव व प्राचार्य सुलक्षणा केवळराम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

गीतांजली हिने तायक्वांदो खेळात उत्कृष्ट कामगिरी करत आपली छाप पाडली असून ती ब्लॅक बेल्ट धारक आहे. तिने अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये पदके जिंकून लातूरचे नाव उज्वल केले आहे. सध्या ती बारावी बोर्ड परीक्षेची तयारी करत असून नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये प्रवेश घेऊन देशसेवा करण्याचे तिचे स्वप्न आहे.
गीतांजलीच्या या यशामागे राष्ट्रीय तायक्वांदो पंच व प्रशिक्षक नेताजी जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, सुरेंद्र कराड, चंद्रकांत लोदगेकर, जयराज मुंडे, प्राचार्य ओंकार होनराव तसेच पत्रकार, क्रीडा शिक्षक व पोलिस अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.
गीतांजलीच्या या यशामुळे तिच्या परिवारासह लातूर जिल्ह्याला अभिमान वाटत आहे. तिचे यापुढील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.