प्रशिक्षण दिलं,पण रोजगार नाही.आता आमदारांनकडे बेरोजगार तरुणांचे लक्ष!


प्रतिनिधी | लातूर 10जुलैराज्यातील 1.34 लाख तरुणांचं भविष्य सध्या एका मोठ्या प्रश्नचिन्हासमोर उभं आहे. ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांनी ११ महिने शासकीय कार्यालयांमध्ये प्रामाणिकपणे काम केलं. लातूर जिल्ह्यात तब्बल ३५०० हून अधिक तरुण या योजनेतून प्रत्यक्ष प्रशासनाचा भाग बनले. मात्र, योजनेचा कालावधी संपत आला असतानाही, शासनाकडून कोणतंही भविष्याच्या दृष्टीनं निर्णय घेतलेला नाही.या पार्श्वभूमीवर लातूरचे आमदार मा. अमित देशमुख यांच्याकडे युवकांच्या मोठ्या वर्गाची आशा लागून आहे. एक अनुभवसंपन्न, अभ्यासू आणि तगडा आवाज विधानसभेतून उठावा, ही वेळेची गरज आहे. आज या योजनेतील युवकांनी शासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आपलं कार्य केलं. पण आता तेच शासन गप्प बसलेलं आहे.निवडणूक प्रचाराच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘योजना संपल्यानंतर या तरुणांना रोजगार दिला जाईल’, अशी स्पष्ट ग्वाही दिली होती. ती आश्वासनं हवेत विरली. हजारो युवक पुन्हा बेरोजगारीच्या स्थितीत परतले आहेत. त्यांचं भविष्य अंधारात आहे.लातूर जिल्ह्यातील आमदार म्हणून अमित देशमुख यांनी हे प्रश्न विधानसभेत उचलणं, केवळ राजकीयच नव्हे, तर नैतिक जबाबदारीही आहे. केवळ भाषणं, उद्घाटनं किंवा स्थानिक कार्यक्रम पुरेसे नाहीत.आज युवकांना त्यांच्या प्रतिनिधीचा स्पष्ट आवाज विधानसभेतून ऐकू यावा, हीच अपेक्षा आहे.योजना केवळ प्रशिक्षणापुरती मर्यादित नाही. ती युवकांच्या आशा-आकांक्षांची शिडी आहे. त्यामध्ये काम केलेल्या तरुणांनी कार्यालयीन व्यवस्थेचा भाग बनून शासनाला मदत केली. आता त्यांनी मांडलेल्या मागण्या रोजगाराची शाश्वती, मानधनवाढ, आणि भरतीत प्राधान्य या न्याय्य आहेत. त्या केवळ निवेदनांपुरत्या मर्यादित राहू नयेत, त्यांचा ठाम उच्चार विधानसभेत व्हावा, अशीच लातूर जिल्ह्यातील तरुणांची आर्त मागणी आहे.सतत जनतेमध्ये वावरणाऱ्या अमित देशमुखांनी आता विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून, या युवकांच्या मागण्यांना दिशा द्यावी, अन्यथा लातूरच्या हजारो कुटुंबांसाठी हा विषय फक्त बेरोजगारीचाच नव्हे, तर उपेक्षेचा ठरेल