एलआयसी कॉलनीत एमडी ड्रग्जचा साठा आणि गावठी पिस्टल जप्त; दोन अटकेत, एक फरार.


लातूर, दि. 10 जुलै 2025 – लातूर शहरातील एलआयसी कॉलनी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दुपारी मोठी कारवाई करत तब्बल ७ लाख ९९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एमडी (मेफेड्रोन) प्रकारचे ७८.७८ ग्रॅम अंमली पदार्थ, विविध मोबाईल फोन्स, रोख रक्कम आणि गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे.पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर दुपारी तीनच्या सुमारास एलआयसी कॉलनीतील एका घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी गणेश अर्जुन शेंडगे (वय 26, रा. एलआयसी कॉलनी, लातूर) आणि रणजीत तुकाराम जाधव (वय 24, रा. दहिसर पूर्व, मुंबई) हे दोघे घरात आढळून आले. त्यांच्या ताब्यातून एमडी ड्रग्जसह गावठी पिस्टल व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.या तिघांनी मिळून अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा घरात लपवून ठेवला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेत असलेल्या दोघांची चौकशी सुरू आहे. तर तिसरा आरोपी फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अंमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, माधव बिलापट्टे, तुराब पठाण, मनोज खोसे, गोविंद भोसले, नवनाथ हासबे, नाना भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, महादेव शिंदे, बंडू नीटुरे आणि सचिन मुंडे यांनी सहभाग घेतला.शहरात अंमली पदार्थांचे प्रमाण वाढत चालल्याने पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेत ही मोठी कारवाई मानली जात आहे. पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस ठाणे करत आहे.