“पक्षीय फोनसमोर झुकणार नाही कायदा!”लातूरच्या रस्त्यावर पोलीस शिस्त विरुद्ध राजकीय दबाव.

लातूर | प्रतिनिधी
लातूर शहरात वाहतुकीसंदर्भातील शिस्तीचा धडाका सुरू असताना, वाहतूक शाखेचे निरीक्षक गणेश कदम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, त्यात गणेश कदम हे विनालायसन्स ऑटो चालवणाऱ्या एका चालकावर कारवाई करत आहेत. कारवाईदरम्यान संबंधित चालकाने एका राजकीय पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्याला फोन लावून दिला. त्यानंतर काय झालं याचा अंदाज अनेकांना आला नसेल!
फोनवर कार्यकर्त्याशी बोलताना निरीक्षक कदम म्हणाले, “बाभळगाव वरून बोलतोय म्हणजे काय? अमेरिकेवरून बोलतोय असं वाटायला लागलं!” अशी तिरकस टिप्पणी करत त्यांनी कार्यकर्त्याला स्पष्टपणे सांगितलं की, वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही.
गणेश कदम हे लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या सुधारासाठी प्रसिद्ध असून, त्यांचा यावर सखोल अभ्यास आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांत बिनधास्त, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून अनेक बेकायदेशीर व बेसिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये एक शिस्त निर्माण झाली आहे.
या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी निरीक्षक कदम यांच्या भूमिकेचे कौतुक केलं आहे. अनेकांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अशा अधिकार्यांमुळेच कायदा खऱ्या अर्थाने सामान्य माणसासाठी उपयोगी ठरतो.”
या प्रकरणातून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे – योग्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप करणे केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे, तर पक्षांचीही प्रतिमा मलिन करू शकते.