बीडमध्ये पुन्हा धक्कादायक घटना – महिला वकिलेला शेतात घेऊन काठ्यांनी, जेसीबी पाईपने बेदम मारहाण; सरपंच आणि दहा जणांविरोधात गंभीर आरोप.

बीड | अंबाजोगाई | १७ एप्रिल:
राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही का? बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा स्त्रीविरोधी हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या एका महिलेला गावातील सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
पीडित महिला गावातील ध्वनिप्रदूषण, घराजवळील पीठ गिरण्या आणि लाऊडस्पीकरांच्या आवाजामुळे होत असलेल्या मायग्रेनच्या त्रासाविरोधात वारंवार कार्यालयीन तक्रारी करत होती. मात्र याचाच राग मनात धरून, सरपंच आणि त्याच्या दहा साथीदारांनी महिलेला शेतात घेराव घालून काठ्यांनी, लोखंडी जेसीबी पाईपने अमानुषपणे मारहाण केली. महिलेला मारहाणीनंतर बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, पण केवळ एका रात्रीतच उपचार करून तिला घरी पाठवण्यात आले.
या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत –
एका वकिलेला अशा पद्धतीने रस्त्याच्या वेशीवर घेऊन मारहाण करणं, तेही गावच्या लोकप्रतिनिधीकडून, हा कायदा आणि सुव्यवस्थेचा खेळखंडोबा नाही का?
गावात सरपंचाचं वर्चस्व इतकं की तक्रार करणाऱ्यांना शारीरिक शिक्षाच दिली जाते?
संबंधित सरपंच कोणत्या पक्षाशी संबंधित आहे? त्याला राजकीय आश्रय मिळतोय का?
या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण असून, संबंधित महिलेला न्याय मिळावा यासाठी विविध सामाजिक संघटना आणि महिला कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ आणि निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीला’ही जर अशा प्रकारे न्याय मिळत नसेल, तर सामान्य महिलांचं काय? बीड जिल्ह्यात कायद्याचं राज्य आहे की नाही, हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.