७ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

लातूर, दि. 18 ऑगस्ट 2025जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या मालिका घडत होत्या. रात्रीच्या वेळी घरांचे कडीकोंडे तोडून घरामध्ये प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गंभीर गुन्ह्यांचा तपास लातूर स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरित्या उकलला आहे.पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला होता. या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे 14 ऑगस्ट रोजी छत्रपती चौक, औसा रोड परिसरातून एका संशयितास चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अविनाश दिलीप भोसले (वय 24, रा. पाटोदा, जि. धाराशिव) असे सांगितले.अविनाश भोसले याने चौकशीत कबुली दिली की, त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून भादा, निलंगा व कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे तीन गुन्हे केले आहेत. आरोपीकडून 40 ग्रॅम सोन्याचे दागिने, तसेच चोरीच्या पैशातून खरेदी केलेली चारचाकी व दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, एकूण हस्तगत मुद्देमालाची किंमत रु. 7 लाख 60 हजार इतकी आहे.भोसले हा धाराशिव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या तो पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून आणखी गुन्ह्यांचा तपास उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, अमितकुमार पुणेकर, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, रामलिंग शिंदे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, सुहास जाधव, धनंजय गुट्टे, गोरोबा इंगोले, प्रज्वल कलमे, श्रीनिवास जांभळे यांनी केली आहे.ताब्यात घेतलेला आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी भादा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.




