14 गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक मदतीसाठी एक लाख रुपयांचा हातभार.

लातूर | गणेशोत्सव म्हटले की डीजे, डॉल्बी, रोषणाई व फिजूल खर्चाची स्पर्धा – हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र लातूरमधील ओम नंदी गणेश मंडळाने या रूढ चौकटीला छेद देत एक वेगळा आणि समाजहिताचा आदर्श समोर ठेवला आहे.यंदाच्या उत्सवात मंडळाने डीजे-डॉल्बी व इतर अनावश्यक खर्च टाळत, त्याच रकमेतून गरजू आणि निराधार 14 विद्यार्थिनींना तब्बल एक लाख रुपयांची शैक्षणिक मदत वार्षिक खर्च म्हणून दिली. ही मदत म्हणजे केवळ आर्थिक साहाय्य नव्हे, तर शिक्षणातून समाजबदल घडविण्याचा एक ठोस संदेश आहे.या उपक्रमाच्या वितरण सोहळ्यास लातूरचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, लोकमत संपादक (लातूर-धाराशिव) धर्मराज हल्लाळे, संतोष बेंबडे, ज्येष्ठ सदस्य रमाकांत थिटे व ऍड. वैशाली लोंढे यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष,गजानन खमीतकर यांच्या पुढाकारातून झाले. या वेळी मंडळाचे माजी अध्यक्ष व पदाधिकारी रमाकांत थिटे, गिरीश पाटील, श्रीकांत हिरेमठ, विजय धना, प्रशांत पाटील, राहुल माकणीकर, महेश देवणे, मनोज थिटे, युवराज बिराजदार, सचिन वळसे, किरण जाधव, किरण बनसोडे, दिनेश बिदरकर, शुभम कोथवाडे, लाला शेख तसेच कार्याध्यक्ष आशिष हाजगुडे उपस्थित होते.आजच्या काळात जिथे उत्सव खर्चाच्या आडवाटेला जाताना दिसतात, तिथे ओम नंदी गणेश मंडळाने घेतलेली ही भूमिका खरंच अनुकरणीय आहे. अशा उपक्रमातून ‘गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषाला समाजोपयोगी कृतीची जोड मिळाल्याने नागरिकांनी याचे कौतुक केले आहे.




