मोजणी न करता हद्द खुणा – विचारपूस करताच भूमापकाचा ‘पळपुटा’ अवतार!


लातूर, ता. १० जुलै –शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी न करता सरळ हद्द खुणा करणे, तेही नोटीस न देता – हा काही सामान्य कारभार नव्हे, तर उपभुमिअभिलेख कार्यालयाचा ‘विशेष नमुना’ आहे! लातूर तालुक्यातील कव्हा गावात अशीच एक घटना समोर आली असून, शेतकऱ्यांनी थेट कारभाराच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.दिनांक ७ जुलै रोजी सकाळी आठच्या सुमारास सालार महबूब पटेल शेख नावाचे भूमापक कव्हा गावात आले आणि थेट हद्द खुणा करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, ही मोजणी कोणाच्या आदेशाने, कोणत्या नोटीसवर आणि कोणत्या शेतकऱ्याच्या संमतीने झाली, हे कोणालाच ठाऊक नव्हते. त्यामुळे संशय बळावला. काही जागरूक शेतकऱ्यांनी भूमापकाकडे चौकशी केली असता, भूमापकाने प्रत्यूत्तर देण्याऐवजी थेट पळ काढला.आता असा पळपुटा भूमापक आणि त्याचा संशयास्पद कारभार हा एकट्याचा नसून, उपभुमिअभिलेख कार्यालयातील मोठ्या गोंधळाचा भाग असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. मोजणीचा सगळा शासकीय कारभार नियमबाह्य पद्धतीने चालविला जातोय का? कोणाच्या सांगण्यावरून भूमापक आले? कुणाच्या इशाऱ्यावर ते पुन्हा न सांगता पळून गेले? या प्रश्नांची उत्तरं अजूनही हवेतच आहेत.याप्रकरणी जेव्हा उपभूमी अधीक्षक चव्हाण यांच्याशी संपर्क केला गेला, तेव्हा त्यांनी कोणतेही उत्तर देण्याचे टाळले. मात्र, अशा प्रकारची मौनं अधिकच संशयास्पद ठरत आहेत.या साऱ्या प्रकारामुळे शेतकरी संतप्त असून, या बेकायदेशीर व संशयास्पद मोजणीप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.उपभुमिअभिलेख कार्यालयाचा हा ‘हद्द’पार कारभार आता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून, पारदर्शकतेच्या नावावर चालणाऱ्या यंत्रणेतील काळी बाजू पुन्हा एकदा उघड झाली आहे.