शॅडो मुख्यमंत्री आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघातील विकास कार्याला अवैध सावकारीचे ग्रहण, लोकांचे आर्थिक शोषण जोरात प्रशासन कोमात!

लातूर | दि 03 मे 2025
राज्यात ‘शॅडो मुख्यमंत्री’ म्हणून ओळख निर्माण करणारे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार अभिमन्यू पवार यांचा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर निघाला असताना एका गंभीर समस्येने डोके वर काढले आहे. लामजना सर्कल व परिसरातील गावांमध्ये अवैध सावकारीचं जाळं विस्तारलं असून, याचा फटका थेट गरीब व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना बसत आहे.
शेतकरी व आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेले नागरिक वेळेवर बँकांकडून किंवा अधिकृत यंत्रणांकडून मदत न मिळाल्यामुळे खाजगी सावकारांकडे वळतात. ही सावकार मंडळी चक्रवाढ व्याजाने कर्ज देत असून, परतफेडीच्या वेळेस मानसिक व आर्थिक छळ सुरु होतो. काही प्रकरणांमध्ये विनयभंग, आत्महत्येचे प्रयत्न, शेतीच्या मालकीच्या हस्तांतरणासारखे गंभीर प्रकार घडत आहेत.

सर्वात चिंतेची बाब म्हणजे या सावकारी जाळ्यामध्ये काही सुशिक्षित, सेवानिवृत्त सरकारी अधिकारी व शिक्षकांचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे. सावकार काही शेतकऱ्यांचे चक्री व्याजाने पैसे देऊन शेत नावावर करून घेत असल्याचे प्रकारही उघड झाले आहेत. अशा प्रकारामुळे केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक दुष्परिणामही दिसून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर, लातूर पोलीस दलाच्या वतीने 19 एप्रिल 2025 रोजी विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे अवैध सावकारीविरोधी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी यावर विशेष लक्ष देत कारवाई सुरू केली आहे. मात्र, ही मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहे – विशेषतः लामजना सर्कल परिसरात.
मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी घेतलेले आमदार अभिमन्यू पवार यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहून पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधून कठोर पावले उचलली पाहिजेत. अवैध सावकारीवर ठोस कारवाई झाली, तर शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल आणि विकासकार्याला बाधा न येता उलट अधिक गती मिळेल.
या पार्श्वभूमीवर, आता वेळ आली आहे की, लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि समाजमाध्यमं मिळून अवैध सावकारीविरोधात एकसंध लढा देतात. कारण, विकास हा केवळ रस्ते, इमारती किंवा योजना यातून नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षित, सुसंस्कृत आणि शोषणमुक्त जीवनातून होतो.