“गोरक्षकांची बडतर्फीची जोरदार मागणी”

लातूर|दि 04/05/2025
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ गोवंशांची बेकायदेशीर विक्री झाल्याच्या गंभीर प्रकरणात पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. गोरक्षक ओम माळी, आदित्य शिंदे आणि ज्योतीराम क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन पुजारी यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
दि. १८ मार्च रोजी तीन छोटा हत्ती व आयशर टेम्पोमध्ये निर्दयीपणे कोंबलेले ३१ गोवंश तस्करीसाठी नेत अस

ल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी गाड्या पकडल्या आणि जनावरं ताब्यात घेतली. मात्र कायद्यानुसार ही जनावरं गोशाळेत ठेवली जाणं अपेक्षित असतानाही ती थेट कसायाला विकण्यात आल्याचा गंभीर आरोप गोरक्षकांनी केला आहे.

गोरक्षकांचे म्हणणे आहे की, न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत गोवंश गोशाळेच्या ताब्यात असणं कायद्याने बंधनकारक आहे. त्याला विरोध करून निरीक्षक पुजारी यांनी गैरकायद्याने गोवंश विक्री केल्याने त्यांच्यावर गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गोरक्षकांनी गांधी चौकात पाच दिवस आमरण उपोषणही केलं होतं. याची दखल घेत आमदार अभिमन्यू पवार यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीतही दोषींवर कठोर कारवाईची मागणी झाली असून पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही याबाबत ठोस आश्वासन दिलं आहे.