गुन्हेगारीला आळा घालणारी कारवाई: लातूर पोलिसांनी केला गांजाचा मोठा साठा जप्त.

चाकूर (प्रतिनिधी) – अण्णाभाऊ साठे नगर, चाकूर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 1 लाख 91 हजार रुपयांचा तब्बल 9.5 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे.
5 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अण्णाभाऊ साठे नगर येथील एका घरात एका व्यक्तीकडून गांजाची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 12:50 वाजता सदर ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात अनिल शिवाजी सूर्यवंशी (वय 48, रा. अण्णाभाऊ साठे नगर, चाकूर) याला ताब्यात घेण्यात आले.

त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता पांढऱ्या रंगाच्या पिशवीत बी मिश्रित 9 किलो 565 ग्रॅम गांजा सापडला. त्याची अंदाजे किंमत 1,91,300 रुपये इतकी आहे.
तपासादरम्यान अनिल सूर्यवंशी याने हा गांजा ओम उर्फ बाळू भगवान वाघमारे (रा. कृष्ठधाम, विवेकानंद चौक, लातूर) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली आहे. सदर प्रकरणी दोघांविरुद्ध गुंगीकारक औषधे आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ओम वाघमारे सध्या फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पो.उ.नि. राजाभाऊ घाडगे, पो.उ.नि. संजय भोसले आणि पोलीस कर्मचारी साहेबराव हाके, मनोज खोसे, नितीन कठारे, राहुल कांबळे, सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, तानाजी बरुरे, आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
पोलीस अधीक्षक लातूर यांच्या कार्यपद्धतीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, जिल्ह्यात गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.