औसा पोलिसांची मोठी कारवाई – 116 किलो गांजा जप्त, तीन जणांवर गुन्हा दाखल.

Bedhadak awaj लातूर – औसा पोलिसांनी मादक पदार्थविरोधी मोठी कारवाई करत 116 किलो गांजा वाहनासह जप्त केला असून, तेलंगणा, ओडिशा आणि औसा येथील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 15 लाख 81 हजार रुपये असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तिसरा आरोपी फरार आहे.

गुप्त माहितीवरून छापा
औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, महात्मा फुलेनगर, औसा येथे एक व्यक्ती आपल्या साथीदारांसह गांजाची अवैध विक्री करत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय पंचासह छापा टाकला.
स्कार्पिओ वाहनातून गांजाची तस्करी
दि. 19 मार्च रोजी सायंकाळी 4.26 वाजता महात्मा फुलेनगर येथे पोलिसांनी छापा टाकला असता, स्कार्पिओ वाहन (क्र. ए.पी. 20 एन. 3637) आढळून आले. वाहनात संशयित रमेश आर यादाईह (रा. ओबलपूर, जाफरगड, वरंगल, तेलंगणा) आणि निबास लक्ष्मीकांत बडई (रा. एमपीव्ही 82, मलकागिरी, मलाभरम, ओडिशा) हे आढळले. वाहनाची झडती घेतली असता प्लास्टिकमध्ये पॅक केलेले गांजाचे अनेक पॅकेट्स आणि दोन मोबाईल सापडले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, सदरचा गांजा औसा येथील परशुराम देविदास कांबळे याने खरेदी केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी परशुराम कांबळेच्या घराची झडती घेतली असता, त्याच्याकडे पाच मोठ्या प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये गांजाचे छोटे-मोठे पॅकेट्स आढळले.
15.81 लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी एकूण 116.14 किलो गांजा, महिंद्रा स्कार्पिओ (क्र. ए.पी. 20 एन. 3637), आणि दोन मोबाईल फोन असा 15,81,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल, एक आरोपी फरार
या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा गुरनं. 108/2025 अन्वये कलम 20, गुंगीकारक औषध आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, परशुराम देविदास कांबळे फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक लातूर श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, प्रमोद बोंडले, सफौ. संजय कांबळे, पोलीस अंमलदार रामकिशन गुटे, मुबाजोददीन सय्यद, मोतीराम घुले, भरत भुरे, गोविंद पाटील आणि बालीका सरवदे यांनी पार पाडली.