गांधी चौक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी;


लातूर |दि/11 जून
लाड गल्ली येथील एका कुटुंबासाठी त्यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच मोठा धक्का बसला. घरातील लोखंडी पेटीत लग्न कार्यासाठी ठेवलेली २ लाख ८० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. ही घटना दि. ८ जून २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी तक्रारदाराने गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा क्रमांक २४१/२०२५, कलम ३३१(१), ३०५ (अ) भा.दं.स. (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, व उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे फक्त १२ तासांत दोन चोरट्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेले आरोपी:
सतिष हुकूमचंद लाड (वय ५०), रा. लाड गल्ली, लातूर
संतोष विजयकुमार चापोलीकर (वय ४५), रा. लाड गल्ली, लातूर
या दोघांकडून चोरीस गेलेली २.८० लाख रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ३.४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अक्रम मोमीन, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, प्रकाश भोसले, राम गवारे, शिवाजी पाटील, संतोष गिरी यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाली.
दरम्यान, पोलीस ठाणे गांधी चौक या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून, पुढील चौकशीत आणखी काही धागेदोरे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.