खरंतर आशियानावरून फिरली सूत्रे , माजी मंत्री दिलीपराव देशमुख ठरले ‘खरे किंग मेकर’

(बेधडक आवाज )
नुकत्याच पार पडलेल्या लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दमदार विजय मिळवत जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या यशामागे ज्यांची भूमिका निर्णायक ठरली, ते राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांपासून नवनिर्वाचित सदस्यांपर्यंत सर्वांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच या निवडणुकीत दिलीपराव देशमुख हेच ‘खरे किंग मेकर’ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लातूर येथील आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी दिलीपराव देशमुख यांनी सर्व नूतन सदस्यांचे अभिनंदन करत, पुढील काळात जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारे लोकाभिमुख कार्य करण्याचा सल्ला दिला. तसेच जिल्ह्यातील मतदार, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
दरम्यान, काँग्रेसच्या या दणदणीत यशाबद्दल माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार केला.
सकाळपासूनच आशियाना बंगल्यावर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नवनिर्वाचित सदस्यांची मोठी गर्दी उसळली होती. विजयाचा आनंद साजरा करत आशियाना निवासस्थान खचाखच भरलेले चित्र पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, आजारी असतानाही दिलीपराव देशमुख यांनी निवडणूक प्रचारात स्वतः पुढाकार घेत गाठीभेटी, सभा आणि रणधुमाळीत सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या अनुभव, मार्गदर्शन आणि नेतृत्वामुळेच काँग्रेसला जिल्ह्यात ऐतिहासिक यश मिळाल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंके, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, विविध साखर कारखान्यांचे पदाधिकारी, नवनिर्वाचित महिला व पुरुष जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुका अध्यक्ष, बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक, प्राध्यापक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, लातूर जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवण्यात दिलीपराव देशमुख यांची भूमिका केंद्रस्थानी राहिली असून, राजकीय वर्तुळात त्यांची ओळख पुन्हा एकदा ‘किंग मेकर’ म्हणून ठळकपणे अधोरेखित झाली आहे.




