शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केला बलात्कार;

Bedhadak awaj | लातूर
लातूर शहरात घटस्फोटित महिला शिक्षिकेवर प्रेमाच्या आमिषाने फसवून शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संतोष गर्जे आणि यशवंत जगताप या दोघांविरोधात विवेकानंद पोलीस ठाण्यात बलात्कार व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी शिक्षिका ही घटस्फोटित असून, तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपी संतोष गर्जे याने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला कातपूर रोडवरील फ्लॅटवर आणि गोवा येथे नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच, हे सांगितल्यास तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
या प्रकरणातील दुसरा आरोपी यशवंत जगताप याने संबंधित महिलेशी संपर्क साधून तिच्यावर वाईट हेतूने स्पर्श करणे, अश्लील चाळे करणे आणि वारंवार विनयभंग करणे असे प्रकार केले. त्यामुळे पीडितेला मानसिक त्रास सहन करावा लागला.
या तक्रारीवरून संतोष गर्जे याच्यावर बलात्काराचा तर यशवंत जगताप याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेडेकर हे करत आहेत.