राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले पुन्हा एकदा अघोरी पूजेसंदर्भात चर्चेत.


रायगड | दि 18 जून
राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले पुन्हा एकदा अघोरी पूजेसंदर्भात चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत असून, या व्हिडीओत गोगावले एका मांत्रिकासोबत पूजा करत असल्याचे दृश्य दिसत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओला आता राजकीय रंग चढला असून, महायुतीतीलच राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी तो शेअर करत गोगावले यांच्यावर टीका केली आहे.
सूरज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भरतशेठ आणि अघोरी विद्या म्हणजेच पालकमंत्री का?” असा खोचक सवाल करत त्यांनी व्हिडीओसह दावा केला की, निवडणुकीपूर्वी गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा करुन घेतली होती.
या प्रकरणाला अधिक वळण मिळालं ते ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केलेल्या आरोपांमुळे. मोरे यांनीही काही दिवसांपूर्वी गोगावले यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता आणि त्यात त्यांनी दावा केला की, 17 ऑक्टोबर 2024 रोजी बगलामुखी मंदिरातील 11 पुजाऱ्यांना बोलावून गोगावलेंनी पूजा केली. एवढंच नव्हे, तर इतर राज्यांतून मांत्रिक आणून त्यांनी अघोरी पूजा घातल्याचाही आरोप त्यांनी केला.
मोरे यांनी थेट सवाल केला – “तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का? मग अशा पूजांचा आधार का घेतला?” आणि पुढे इशाराही दिला की, “जर गोगावले हे आरोप नाकारतील, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आम्ही तक्रार दाखल करू.”
गोगावले यांचे प्रत्युत्तर:
आरोपांवर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले यांनी वसंत मोरे यांच्या टीकेला फेटाळलं. “मला अघोरी पूजा करायची असती, तर मी थेट पालकमंत्रिपदासाठीच केली असती,” असा उपरोधिक प्रतिसवाल करत त्यांनी म्हटलं की, “आम्ही पंढरपूर, सिद्धीविनायक, स्वामी समर्थ यांच्या मंदिरात प्रार्थना करतो. अघोरी पूजा वगैरे आमच्याशी संबंधित नाही.”
राजकीय पार्श्वभूमी:
रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यात सुरू असलेलं शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. अशा पार्श्वभूमीवर अघोरी पूजेसंबंधी व्हिडीओची वेळ आणि त्यावरून उठलेली धुळ राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचीही चर्चा आहे.
राजकीय वर्तुळात हे सगळं “पालकमंत्रिपदासाठीची मंत्रजागर” म्हणून पाहिलं जात आहे!