

दिनांक : 11 जुलै 2025 | लातूरलातूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर लातूर पोलिसांनी आज सकाळी मोठी धडक कारवाई केली. सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान, जिल्हाभरात एकाचवेळी छापेमारी करत 469 पानटपऱ्या आणि किराणा दुकानांची तपासणी करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक तांबे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अवैध धंद्यांविरोधात कठोर आणि प्रभावी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही विशेष मोहीम राबविण्यात आली.जिल्ह्यातील सर्व 23 पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात एकाचवेळी 67 पथकांनी ही छापेमारी केली. तपासणीदरम्यान अनेक दुकानांमध्ये गुटखा, सुगंधित तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. याअंतर्गत भारतीय न्याय संहिता व ‘COTPA Act, 2003’ (सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम) अंतर्गत एकूण 07 गुन्हे दाखल करण्यात आले असून, कारवाईदरम्यान 5,63,517 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय COTPA कायद्यान्वये 149 कारवाया केल्या गेल्या आहेत.सदर मोहीम अंतर्गत 218 शाळा व महाविद्यालयांना भेटी देण्यात आल्या. शाळा व कॉलेज परिसरातील 469 दुकानांची तपासणी झाली, त्यातील अनेक दुकानांमध्ये नियमबाह्यरीत्या तंबाखूजन्य पदार्थ विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावर कठोर कारवाई करण्यात आली.या विशेष मोहिमेसाठी एकूण 53 अधिकारी आणि 245 पोलिस अमलदारांची नियुक्ती करण्यात आली होती. कारवाईचे स्वरूप इतके व्यापक होते की एकाचवेळी संपूर्ण जिल्ह्यात या 67 पथकांनी कारवाई पार पाडली.पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, “शाळा आणि महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री खपवून घेतली जाणार नाही. अशा विक्रेत्यांविरुद्ध पुढील काळात आणखी कठोर कारवाई केली जाईल.”