देशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

शहराध्यक्षपद म्हणजे संधी की अंतिम परीक्षा?अजित पाटील कव्हेकर यांच्यासमोर नेतृत्वाची सत्वपरीक्षा!

Bedhadak awaj (शरद पवार )लातूरच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता स्थापनेच्या दिशेने विविध प्रयत्न केले. मात्र, प्रत्येक निवडणुकीत पक्षाला यशाच्या उंबरठ्यावर येऊन थांबावं लागलं. यामागचं प्रमुख कारण म्हणजे स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचा अभाव, गटबाजी, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि कार्यकर्त्यांचा कमकुवत संवाद. अशा पार्श्वभूमीवर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून अजित पाटील कव्हेकर यांची निवड भाजपसाठी एक वेगळी दिशा ठरावी अशी अपेक्षा होती. पक्षाला एका अभ्यासू, तरुण आणि सोशल मीडियावर सक्रिय चेहऱ्याची गरज होती, जो नव्या पिढीशी संवाद साधू शकेल आणि पक्षाला नवसंजीवनी देईल. या दृष्टीने कव्हेकर यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली, पण या निवडीवरून पक्षातच एक वेगळं नाराजीचं वादळ उठलं.कव्हेकर यांना वगळून बसवराज पाटील यांना अध्यक्षपद मिळावं, अशी कार्यकर्त्यांमधली मागणी दीर्घकाळ सुरु होती. त्यांचा लिंगायत समाजात असलेला प्रभाव, पक्षातील दीर्घ अनुभव, आणि स्थानिक राजकारणातील बारकाव्यांची जाण ही त्यांच्या बाजूने होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी कव्हेकर यांच्यावर विश्वास टाकला आणि एकप्रकारे पक्षाला नव्या नेतृत्वाच्या प्रयोगाकडे नेलं. ही नेमणूक कार्यकर्त्यांमध्ये फारशी रुचली नाही, आणि याचा परिणाम पक्षाच्या संघटनात्मक कामकाजावर दिसू लागला. काही विभागांमध्ये बैठकांना प्रतिसाद मिळाला नाही, कार्यकर्ते निरुत्साही झाले, तर काही ठिकाणी थेट नाराजीचं वातावरण तयार झालं.”या वातावरणाचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला. भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला, आणि या पराभवामागे पक्षांतर्गत असंतोष, नेतृत्वाची विस्कळीत धुरा आणि स्थानिक पातळीवरील असहकार्य ही प्रमुख कारणं ठरली, असा आवाज कार्यकर्त्यांमध्ये आजही ऐकू येतो.”अर्चना चाकूरकर यांचा झालेला पराभव ही केवळ विरोधकांच्या ताकदीची झलक नव्हती, तर पक्षातील अंतर्गत असहकाराचे आणि नेतृत्वाकडे असलेल्या विश्वासअभावाचे दर्शन होते. स्थानिक राजकीय चर्चांमध्ये अनेकदा ही गोष्ट अधोरेखित झाली की, कव्हेकर यांच्या नेतृत्वाखालील काही मंडळींचा त्या निवडणुकीत सहभाग अत्यल्प होता. या पार्श्वभूमीवर अजित पाटील कव्हेकर यांच्यावर सध्या अविश्वासाचं सावट आहे.याच वेळी लातूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. काँग्रेसने आधीपासूनच वॉर्ड रचना, संभाव्य उमेदवारांची चाचपणी, आणि प्रचार रचना यावर काम सुरू केलं आहे. राष्ट्रवादीनेही स्थानिक गटांशी समन्वय वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र भाजपकडे अजूनही एकवाक्यता नाही. बैठका होत असल्या तरी त्यातून ठोस निर्णय पुढे येत नाहीत. ही परिस्थिती पक्षासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. विशेषतः जेव्हा स्थानिक पातळीवर असलेल्या नाराजीला कव्हेकर रोखू शकले नाहीत, तेव्हा त्यांच्या नेतृत्वावर अधिकच प्रश्न निर्माण होतात.अजित पाटील कव्हेकर यांच्यासाठी ही निवडणूक केवळ महापालिका जिंकण्याची संधी नाही, तर ही त्यांच्या राजकीय अस्तित्वाची खरी सत्वपरीक्षा ठरणार आहे. त्यांच्या नावावर पक्षाने जो विश्वास ठेवला, तो आता जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये टिकवणं हे त्यांचं सर्वोच्च कर्तव्य आहे. अन्यथा या संधीचं ओझं त्यांच्या राजकीय प्रवासाच्या शेवटाची सुरुवात ठरू शकतं. भाजपने शहरात प्रभाव वाढवण्यासाठी वेळोवेळी नेतृत्व बदल केले, पण सर्वात मोठी अडचण नेहमी नेतृत्वाचा समाजाशी असलेला तुटलेला संवाद आणि गटबाजीचं कुंपण राहिलं. कव्हेकर जर हे मोडून काढू शकले नाहीत, तर त्यांना पक्षश्रेष्ठींकडून आलेली ही संधी ‘असफल प्रयोग’ म्हणूनच नोंदवली जाईल.आज भाजपला लातूरसारख्या शहरी भागात सत्ता हवी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर घटकांच्या तुलनेत पक्षाकडे संसाधनांची कमतरता नाही. पण त्यांच्याकडे एकजूट, ठोस रणनीती आणि प्रभावी नेतृत्वाची उणीव स्पष्टपणे जाणवते. अजित पाटील कव्हेकर यांना ही रिकामी जागा भरून काढण्याची संधी मिळाली आहे. मात्र यासाठी त्यांना स्वतःला बदलावं लागेल – संवादकौशल्य वाढवावं लागेल, गटबाजीला दूर ठेवावं लागेल, आणि पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला सहभागी करून घेणारी शैली स्वीकारावी लागेल.इतिहास सांगतो, लातूरच्या राजकारणात संधी एकदाच मिळते. ही संधी त्यांनी साधली, तर पुढील पिढी त्यांना ‘संकटातून घडलेला नेता’ म्हणून पाहील. पण जर त्यांनी यालाही गमावलं, तर ते फक्त एक प्रयोग ठरतील, जो पक्षाने वेळेअभावी स्वीकारला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button