आरोग्यक्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्र

अवैध हातभट्टी व दारू विक्रीवर लातूर पोलिसांची धडक कारवाई; 73 गुन्हे दाखल, 1.71 लाखांचा मुद्देमाल जप्त.

दिनांक – 12 मे 2025
लातूर जिल्ह्यात हातभट्टीपासून देशी-विदेशी दारूच्या अवैध विक्रीपर्यंत फैलावलेल्या दारूबंदीविरोधी धंद्यावर लातूर पोलिसांनी रविवारी पहाटे मोठी कारवाई केली. जिल्हाभरात एकाच दिवशी विविध ठिकाणी छापे टाकत 73 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण 1 लाख 71 हजार 283 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, हजारो लिटर हातभट्टी दारू आणि रसायन नष्ट करण्यात आले आहे.

ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्ह्यात रविवारी (11 मे) पहाटेपासून ‘मासरेड’ मोहीम हाती घेण्यात आली होती.

या कारवाईसाठी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधून 23 अधिकारी आणि 105 पोलीस अंमलदारांची विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी दुर्गम भागांमध्ये जाऊन हातभट्टी तयार करणारे, त्याची साठवणूक करणारे आणि देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर एकामागोमाग एक धाडसी कारवाया केल्या.

या मोहिमेदरम्यान एकूण 73 प्रकरणांत 73 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हातभट्टीपासून तयार दारू, त्यासाठी वापरण्यात येणारे रसायन आणि देशी-विदेशी दारूचा साठा असा एकत्रित 1,71,283 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात हातभट्टीचा साठा ताबडतोब नष्ट करण्यात आला.

लातूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अवैध मद्य व्यवसायाविरुद्ध अशी कारवाई पुढील काळातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button