गरजू लाभार्थ्यांना शासकीय मदत ‘संवाद कार्यालयातून’; तहसीलदारांचे मन मोठं की आमदारांचा दबाव?


लातूर, दि. ७ जुलै (Bedhadak awaj) –गरजू लाभार्थ्यांना शासकीय मदत मिळावी, हे सर्वसामान्य जनतेचं अपेक्षित स्वप्न. परंतु लातूर तालुक्यात शासकीय मदत थेट तहसील कार्यालयातून नव्हे, तर खासगी राजकीय ‘संवाद कार्यालयातून’ वाटली जात असल्याचं चित्र समोर आलं आहे. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, मदतीच्या वाटपामागे तहसीलदारांचे मोठेपण आहे की आमदारांचा प्रशासनावरचा दबाव?गेल्या सप्टेंबर २०२४ मध्ये लातूर तालुक्यातील मौजे मुरुड आणि भातखेडा या गावांमध्ये आलेल्या वादळ व मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. अशा संकटात शासनाने जाहीर केलेली आपत्ती मदत लाभार्थ्यांना देण्यात आली. मात्र ही मदत थेट तहसील कार्यालयातून न देता आमदार रमेशआप्पा कराड यांच्या ‘संवाद कार्यालयात’ एका कार्यक्रमात वाटण्यात आली. यामध्ये मुरुडमधील ७७ आणि भातखेड्यातील ३ लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत तर संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरीपत्रांचेही वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, तसेच भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय पक्षाच्या कार्यालयातून शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असतील तर प्रशासनाची भूमिका आणि लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिक आहे.या कार्यक्रमात आमदार रमेशआप्पा कराड यांनी बोलताना सांगितले की, शासनाच्या विविध योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. लातूर ग्रामीण मतदारसंघात गरजू लाभार्थ्यांना सर्वाधिक लाभ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. “शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रत्येकाने स्वतःचा आणि गावाचा विकास करावा,” असे आवाहन त्यांनी केलं.तसेच, केंद्र सरकारच्या नेतृत्वात जिल्ह्यात हजारो कोटींच्या रस्त्यांचे काम झाले असून शक्तीपीठ महामार्ग भविष्यातील प्रगतीचा मार्ग असल्याचे आमदारांनी सांगितले. मात्र, या महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा विरोध असूनही त्याकडे दुर्लक्ष करत आमदारांनी विरोधकांवर टीका केली.उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी ‘फार्मर आयडी’च्या गरजेवर भर देत, प्रत्येक मंडळात सर्व प्रकारची प्रमाणपत्रे सहज मिळावीत यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तर तहसीलदार सौदागर तांदळे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत ८२ किलोमीटरचे ७२ शेतरस्ते पूर्ण केल्याचं सांगितलं.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार रमेशआप्पा कराड यांचा सत्कार उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन वैभव सापसोड यांनी केलं. यावेळी नायब तहसीलदार गणेश सरवदे, पुरवठा निरीक्षक गणेश अंबर, संगायोचे परमेश्वर कांबळे, विविध योजनेचे लाभार्थी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासकीय योजनांचा लाभ पक्षाच्या खाजगी कार्यालयातून वाटला जावा, हा प्रकार प्रशासन आणि राजकारण यामधील सीमारेषा किती धूसर झाली आहे याचे ठळक उदाहरण आहे. तसेच शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या महामार्गाला ‘प्रगतीचा मार्ग’ म्हणून महिमामंडित करणं हे निव्वळ राजकीय पद्धतीचं समर्थन असल्याची चर्चा गावागावांत सुरू आहे.