

लातूर | 11 जून 2025
लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सौ. मानसी मीना यांची नुकतीच नियुक्ती झाली असून, ही नियुक्ती संपूर्ण लातूर जिल्ह्यासाठी एक नवी दिशा दर्शवणारी ठरणार आहे. भारतीय प्रशासन सेवेतून (IAS) आलेल्या मानसी मीना या २०२१ बॅचच्या अधिकारी असून, त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला होता. गडचिरोलीसारख्या आदिवासी, संवेदनशील आणि दुर्गम भागात काम करत असताना त्यांनी स्थानिक समस्या, वनहक्क, जमीन पुनर्वाटप, आदिवासी विकास योजना, आणि आरोग्यविषयक सुविधांवर विशेष लक्ष दिलं. त्यांनी प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा तयार करताना विविध सामाजिक गटांशी संवाद प्रस्थापित करत, विकासात सहभागीतेचा धागा निर्माण केला होता.
मानसी मीना यांचा एक ठाम दृष्टिकोन म्हणजे, योजना केवळ कागदावर न राहता त्या जमिनीवर उतराव्यात, असा होता. त्यामुळेच त्यांच्या कार्यकाळात देसाईगंज उपविभागात महिला सक्षमीकरण, शैक्षणिक सुविधा, जलसंधारण, वनहक्काच्या दाव्यांवरील निर्णयन यासारख्या बाबींत प्रशासनाची कार्यक्षमता वाढल्याचं चित्र दिसून आलं. त्यांनी पारदर्शक कारभार ठेवत, जनतेचा विश्वास जिंकणं महत्त्वाचं मानलं. यातच त्यांच्या नेतृत्वगुणांची खरी ओळख झाली.
लातूरसारख्या शहरात महापालिकेच्या आयुक्तपदावर येताना त्यांच्या समोर असंख्य आव्हानं उभी आहेत. शहराचा विस्तार, अनियंत्रित झोपडपट्ट्या, मलनिस्सारण व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, शहर नियोजन, वाहन पार्किंगच्या समस्या, तसेच शहरात वाढणारी लोकसंख्या – या सर्व बाबींवर शाश्वत उपाययोजना करण्याचं दडपण त्यांच्या खांद्यावर आहे. पण त्यांच्या आधीच्या कारकिर्दीवरून पाहता, त्या या सर्व समस्यांकडे दीर्घकालीन आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहतील, अशी अपेक्षा करता येते.
त्यांची ही नेमणूक लातूरच्या दृष्टीने केवळ प्रशासकीय बाब नसून, ती एक सामाजिक बदलाची शक्यता निर्माण करणारी घडामोड आहे. कारण लातूर मनपाच्या इतिहासात त्यांची नियुक्ती ही पहिल्या महिला आयुक्त म्हणून झाली आहे. त्यामुळे शहरातील महिला वर्गात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे. महिला नेतृत्व शहर प्रशासनात सक्रिय होत असल्याने महिलांच्या प्रश्नांवर अधिक संवेदनशीलतेने आणि कार्यक्षमतेने विचार केला जाईल, ही लोकांची आशा आहे.
गेल्या काही वर्षांत लातूर शहराचा विकास गोंधळलेल्या व्यवस्थेमुळे अडकला होता. योजना असल्या तरी त्यांची अंमलबजावणी फक्त निवडणुकीपुरती, कागदावरती आणि निवडक भागापुरतीच मर्यादित होती. मानसी मीना यांचं आगमन हे यापासून वेगळ्या प्रवाहाची सुरुवात करणारे ठरेल का, हे येणारा काळच ठरवेल. त्यांच्या स्वच्छ, पारदर्शक आणि प्रशासनकेंद्री दृष्टिकोनातून लातूरचा कारभार अधिक गतिमान होईल, ही अपेक्षा आहे.
शहरात स्वच्छता, ट्रॅफिक नियमन, स्मार्ट सिटी योजनेचा प्रभावी अंमलबजावणी, हरित क्षेत्राची वाढ, आणि नागरी सुविधांचा सुयोग्य पुरवठा या बाबींसाठी सक्षम नेतृत्वाची गरज होती. या गरजेची पूर्तता आता सौ. मानसी मीना यांच्या माध्यमातून होईल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्यांनी पहिल्याच संवादात स्पष्ट केलं की शहराचा सर्वांगीण विकास हाच आपला उद्देश आहे आणि शहराला सक्षम, स्वच्छ व समतोल प्रशासन देण्याचीच भूमिका त्या पार पाडणार आहेत.
याशिवाय, सिव्हिल सोसायटी, स्थानिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक क्षेत्र आणि युवा पिढी यांना शहर प्रशासनात सहभागी करून घेणं हे त्यांचं प्रमुख लक्ष्य असणार आहे. लोकसहभाग आणि विश्वासार्ह प्रशासन हीच विकासाची खरी गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी अनेकदा आपल्या भाषणांमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्या काळात शहर विकासात नागरिकांची सक्रिय भूमिका निश्चितच दिसून येईल.
अनेकदा आयुक्त बदलले गेले, पण अपेक्षित परिवर्तन शहराला लाभलं नाही. त्यामुळे मानसी मीना यांच्या नावावर लोकांचा विश्वास अधिक आहे. त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि सामाजिक भानातून उभं राहिलेलं नेतृत्व लातूरला नवा श्वास देईल, असं वाटतं. शहर विकासाचा नवीन अध्याय आता एका हुशार, निष्ठावान महिला अधिकाऱ्याच्या हातात आहे. त्यांचं काम केवळ आकडेवारीत नाही, तर जनतेच्या मनात उमटावं, हीच खरी अपेक्षा. आणि याच अपेक्षेने लातूरने एक नव्या युगात प्रवेश केला आहे.