स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 4.45 लाखांचा मुद्देमाल जप्त.

लातूर | 11 जून 2025
शहरातील रेनापूर नाका बसस्थानक क्रमांक दोनच्या परिसरात मंगळवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत 11 किलो 700 ग्रॅम गांजासह तीन जणांना ताब्यात घेतले. एकूण 4 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने लातूरमध्ये गांजाच्या अवैध विक्रीचे पुन्हा एकदा गंभीर वास्तव समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला खबर मिळाली होती की दोन महिला आणि एक पुरुष एका ऑटो रिक्षामध्ये बसून गांजाची चोरटी विक्री करत आहेत. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पथकाने रेनापूर नाका परिसरातील बसस्थानक क्रमांक दोन येथे सायंकाळी 5 च्या सुमारास छापा टाकला.

ऑटोमध्ये बसलेल्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली:
- गोपाळ बालाजी डावखरे (वय 27), रा. तानाजी चौक, सध्या रा. कृष्ठधाम, लातूर
- मयुरी शंकर वाघमारे (वय 20), रा. बालाजी नगर, सारोळा रोड, सध्या रा. कृष्ठधाम, लातूर
- राधाबाई आश्रुबा गायकवाड (वय 60), रा. भीमनगर, परभणी
तिघांची झडती घेतली असता ऑटोमध्ये ठेवलेल्या निळ्या रंगाच्या पोत्यात बी मिश्रित गांजा आढळून आला. त्याचे वजन 11.7 किलो असून बाजारमूल्य अंदाजे 2 लाख 34 हजार रुपये इतके आहे. तसेच ऑटो रिक्षा आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 4 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी तिघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. यामध्ये साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, नितीन कठारे, राहुल कांबळे, संजय कांबळे, मोहन सुरवसे, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, सचिन धारेकर, बंडू नीटुरे, संतोष देवडे, तसेच महिला पोलीस अंमलदार कुंभार व अंजली गायकवाड यांचा समावेश होता.
या घटनेमुळे लातूर शहरात गांजाच्या वाढत्या अवैध विक्रीचे गांभीर्य अधोरेखित झाले असून, यामागे असलेल्या मोठ्या टोळीचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.